महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; महाराष्ट्रात पहिल्या एक कोटी लखपती दीदी घडवण्याचे आवाहन
मुंबईतील बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात देशातील पहिल्या एक कोटी लखपती दीदी घडवण्याचे आवाहन केले. उमेद मार्ट ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर १ हजार नवीन वस्तू सूचीबद्ध करण्यात आल्या.
मुंबई, दि. २ : विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी नारीशक्तीचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. देशाच्या विकासात महिलांचे योगदान मोठे असून भारत पूर्णपणे विकसित व्हायचा असेल तर महिलांनी अर्थव्यवस्थेचा सक्रिय भाग बनणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. याचवेळी देशातील पहिल्या एक कोटी लखपती दीदी महाराष्ट्रातच घडल्या पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले.
मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील एमएमआरडीए मैदानावर आयोजित महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, राज्यमंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरू केल्या असून त्याचा मोठा लाभ महिलांना होत आहे. राज्यात सध्या ५० लाख लखपती दीदी तयार होत आहेत. महिलांशी संबंधित सर्व यंत्रणा हे ‘पॉवर हाऊस’ असून त्यांच्या योगदानातून शासनाची ३०० कोटी वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करायची आहे.
त्यासाठी उमेद योजनेच्या माध्यमातून महिला बचत गटांना नर्सरी उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. नर्सरी उभारणी, वृक्षलागवड आणि झाडांची निगा राखण्यासाठी शासनाकडून खर्च दिला जाईल. यामुळे महिला बचत गटांना व्यावसायिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, महालक्ष्मी सरस प्रदर्शन हे जागतिक दर्जाच्या प्रदर्शनाशी तुलना करता येईल, अशा पातळीवर उभारण्यात आले आहे. राज्यात महिला बचत गटांची मोठी चळवळ उभी राहिली असून कोट्यवधी महिला या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत. अनेक महिलांनी स्वतःची उत्पादने तयार करून बाजारपेठ मिळवली आहे.
उमेद मार्टवर १ हजार नवीन वस्तू सूचीबद्ध
देशात ई-कॉमर्स वेगाने वाढत असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, उमेद मार्ट या डिजिटल प्लॅटफॉर्मवर महिला बचत गटांच्या उत्पादनांना ऑनलाइन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्मवर १ हजारांहून अधिक वस्तू उपलब्ध आहेत. राज्यातील नागरिकांनी उमेद मार्टवरून खरेदी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
२० जिल्ह्यांत उमेद मॉल, उर्वरित १६ जिल्ह्यांत लवकरच
महिला बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ देण्यासाठी २० जिल्ह्यांत उमेद मॉलचे काम सुरू करण्यात आले आहे. उर्वरित १६ जिल्ह्यांतही लवकरच काम सुरू होणार असून पुढील काही वर्षांत हे जाळे तालुका स्तरापर्यंत विस्तारित करण्याचा शासनाचा मानस असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
६४ लाख कुटुंबांना लाभ
प्रास्ताविकात मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, राज्यातील ३९ हजार ५५८ गावांमध्ये ‘उमेद’ योजना पोहोचली आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून ६४ लाख कुटुंबांना लाभ मिळाला आहे. राज्यात सध्या ६ लाख ६८ हजार बचत गट कार्यरत असून ३३१ महिला शेतकरी कंपन्या देखील कार्यरत आहेत.
महिलांना दिलेल्या कर्जाचा एनपीए १ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे सांगत त्यांनी महिलांची कर्जफेडीची शिस्त विशेष असल्याचे नमूद केले.
स्टॉलला भेट, यशकथांचे पुस्तक प्रकाशित
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी विविध स्टॉलला भेट देऊन महिला उद्योजिकांशी संवाद साधला. यावेळी उमेदच्या ६८ यशकथांवरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून आलेल्या असंख्य महिला उपस्थित होत्या.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0