महाराजस्व समाधान शिबीर’मुळे शासन सेवा नागरिकांच्या दारी – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई उपनगर जिल्ह्यात आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानांतर्गत नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ वितरित करण्यात आले. शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

May 15, 2026 - 20:44
 0  3
महाराजस्व समाधान शिबीर’मुळे शासन सेवा नागरिकांच्या दारी – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रशेखर बावनकुळे, महाराजस्व समाधान शिबीर, मुंबई उपनगर जिल्हा,

मुंबई : शासनाचे काम अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानांतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ वितरित करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासन नागरिकांना एकाच ठिकाणी विविध सेवा उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले.

अंधेरी येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलात या अभियानाच्या सहाव्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार हारून खान, आमदार विक्रांत पाटील, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच महसूल आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महसूल विभागाने नागरिकांच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. अकृषक कायद्यात सुधारणा करून कराची वार्षिक आकारणी रद्द करण्यात आली आहे. तुकडेबंदी कायदा रद्द झाल्याने लाखो कुटुंबांच्या घरांना कायदेशीर मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ते पुढे म्हणाले की, व्हर्टिकल सातबारामुळे फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. महसूल विभागाकडून “आधी मोजणी, नंतर नोंदणी आणि त्यानंतर म्युटेशन” ही प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला जाणार असून त्यामुळे नोंदणीनंतरचे वाद कमी होतील. तसेच लँड टायटलिंगमुळे मालमत्तेची संपूर्ण माहिती प्रॉपर्टी कार्डमध्ये उपलब्ध होऊन खरेदी-विक्री प्रक्रिया ऑनलाइन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महसूल विभागाच्या निर्णयांचे कौतुक करताना सांगितले की, महाराजस्व समाधान शिबिरांमुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी सहज उपलब्ध होत आहेत. उपनगर जिल्ह्यातील पाच हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीची शर्तभंग झालेली जमीन रिकामी करून घेतल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे विशेष अभिनंदन केले.

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी प्रास्ताविकात सांगितले की, जिल्हा प्रशासन लोकाभिमुख आणि पारदर्शक पद्धतीने सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. महाराजस्व समाधान शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना विविध सेवा गतिमान पद्धतीने दिल्या जात आहेत.

कार्यक्रमात अधिवास, उत्पन्न आणि ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, सातबारा उतारे, फेरफार, संजय गांधी निराधार योजनेचे लाभ, शिधापत्रिका, प्रॉपर्टी नक्कल, पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना कार्ड, निवडणूक उतारे, तृतीयपंथी ओळखपत्र तसेच बचतगटांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. याशिवाय झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सदनिकांचेही वाटप करण्यात आले.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0