शाश्वत विकास आणि ग्रीन इंडस्ट्रीत महाराष्ट्र आघाडीवर; मुख्यमंत्रींची भविष्यकालीन औद्योगिक दृष्टी स्पष्ट
ऊर्जा, शाश्वत पायाभूत सुविधा आणि ग्रीन मोबिलिटीच्या माध्यमातून महाराष्ट्र भविष्यातील औद्योगिक केंद्र बनत असल्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि गडचिरोलीच्या विकासासाठी राज्य सरकारने दीर्घकालीन धोरण आखल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई : ऊर्जा, शाश्वत पायाभूत सुविधा, लवचिक पुरवठा साखळी आणि पर्यावरणपूरक व्यवस्था असलेल्या राज्यांनाच भविष्यातील उद्योग प्राधान्य देतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र हा बदल ओळखून अक्षय ऊर्जा, ईव्ही इकोसिस्टम, ग्रीन मोबिलिटी आणि शाश्वत औद्योगिक पायाभूत सुविधांचा आक्रमकपणे विस्तार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, “आमच्यासाठी शाश्वतता हा केवळ नियम पालनाचा विषय नसून तो महाराष्ट्राचे स्पर्धात्मक धोरण आहे.” आजचे तरुण उद्योजक आणि व्यावसायिक केवळ पगाराचा विचार करत नाहीत, तर ते अनुकूल वातावरण आणि जीवनशैलीची निवड करतात. त्यामुळे महाराष्ट्राचा शहरी कायापालट हा राज्याच्या आर्थिक दृष्टीकोनाचा केंद्रबिंदू बनला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विविध शहरांच्या विकासासाठी विशेष धोरण
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील प्रमुख शहरांच्या विकास आराखड्याबाबत माहिती देताना सांगितले की, मुंबई ही जागतिक आर्थिक आणि नाविन्यपूर्ण राजधानी म्हणून विकसित होत राहील. पुणे हे उत्पादन, तंत्रज्ञान आणि संशोधन केंद्र म्हणून आपली ताकद अधिक मजबूत करेल.
तसेच नागपूर हे भारताचे लॉजिस्टिक आणि भू-धोरणात्मक केंद्र म्हणून उदयास येत असल्याचे त्यांनी नमूद केले. छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक ही नवीन युगातील मॅन्युफॅक्चरिंग हब ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गडचिरोली ‘ग्रीन स्टील’चे केंद्र बनणार
मुख्यमंत्री म्हणाले की, गडचिरोली हे २०३२ पर्यंत भारतातील सर्वात मोठे ‘ग्रीन स्टील’ उत्पादक जिल्हा बनणार आहे. तसेच राज्यातील द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरे ही भविष्यात औद्योगिक विकासाची नवी इंजिने ठरतील. संतुलित प्रादेशिक विकास हा सामाजिकदृष्ट्या तसेच आर्थिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
उद्योग आणि शासनाची भागीदारी महत्त्वाची
महाराष्ट्राची सर्वात मोठी ताकद म्हणजे येथील खुलेपणा, उद्योजकता, प्रगतिशील नागरिक आणि नव्या कल्पनांना स्वीकारण्याची क्षमता असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. “महाराष्ट्र उद्योगांकडे राष्ट्रनिर्मितीतील भागीदार म्हणून पाहतो. केवळ सरकार किंवा केवळ उद्योग जागतिक स्तरावरील अर्थव्यवस्था उभी करू शकत नाहीत. सरकार, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि संशोधक यांनी एकत्रितपणे काम केल्यासच भारताचे भवितव्य अधिक सक्षम होईल,” असे त्यांनी नमूद केले.
सीआयआयकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचे कौतुक
यावेळी सीआयआय चे डायरेक्टर जनरल चंद्रदीप बॅनर्जी आणि अध्यक्ष राजीव मेमाणी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे कौतुक केले.
What's Your Reaction?
Like
5
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0