माझी वसुंधरा अभियानात लोकसहभाग वाढविण्यावर भर; हवामान कृती आराखड्यांचा नियमित आढावा घेणार – पंकजा मुंडे
माझी वसुंधरा अभियान अधिक प्रभावी करण्यासाठी युवक, विद्यार्थी, महिला आणि सामाजिक प्रभावकांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच हवामान कृती आराखड्यांचा नियमित आढावा घेण्यासह राज्यातील सर्व शहरांसाठी हवामान कृती आराखडे तयार करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.
मुंबई प्रतिनिधी संदीप गिरकर: पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राज्य सरकारने माझी वसुंधरा अभियान अधिक लोकाभिमुख आणि प्रभावी करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी अभियानात युवक, विद्यार्थी, महिला आणि सामाजिक प्रभावकांचा (इन्फ्लुएन्सर्स) व्यापक सहभाग वाढविण्यावर भर देण्याचे निर्देश दिले आहेत.
पर्यावरण व वातावरणीय बदल विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा अभियान आणि राज्य वातावरणीय बदल कक्षाच्या पुनर्रचनेच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार आणि उपसचिव जॉय ठाकूर उपस्थित होते.
मंत्री मुंडे यांनी सांगितले की, पर्यावरण संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ‘वसुंधरा रक्षक’ म्हणून जोडण्याची संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात यावी. तसेच नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी सोशल मीडियाप्रमाणे स्वतंत्र डिजिटल व्यासपीठ विकसित करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
माझी वसुंधरा स्पर्धेच्या मूल्यांकन पद्धतीतही बदल सुचविताना त्यांनी लोकसंख्येऐवजी प्रदूषणाचा निकष अधिक महत्त्वाचा मानावा, असे सांगितले. वृक्षारोपण, पाणी पुनर्वापर, कापडी पिशव्यांचा वापर, सायकलिंग, नैसर्गिक शेती आणि इतर पर्यावरणपूरक उपक्रमांना अधिक गुणांकन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच डोंगराळ, ग्रामीण आणि औद्योगिक भागांच्या भौगोलिक व सामाजिक परिस्थितीनुसार स्वतंत्र गुणांकन प्रणाली विकसित करण्याचे निर्देश दिले.
नैसर्गिक शेती, रासायनिक खतांचा कमी वापर, मृदासंवर्धन, धूरमुक्त व धूळमुक्त गावे, पाण्याचा पुनर्वापर, वृक्षारोपण आणि अक्षय ऊर्जेचा वापर यांसारख्या बाबींना अभियानात विशेष प्राधान्य देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
राज्य वातावरणीय बदल कक्षाच्या पुनर्रचनेबाबत स्वतंत्र आणि सक्षम यंत्रणा उभारण्यावरही बैठकीत चर्चा झाली. हवामान बदलाशी संबंधित धोरण आखणी, जनजागृती, प्रकल्प व्यवस्थापन, हवामान कृती आराखड्यांचे मूल्यमापन आणि हवामान वित्तपुरवठा यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त करण्यात आली.
सध्या राज्यातील सात शहरांचे हवामान कृती आराखडे तयार झाले असून आणखी नऊ शहरांचे आराखडे तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या धर्तीवर राज्यातील सर्व शहरांसाठी हवामान कृती आराखडे तयार करण्याचे निर्देश मंत्री मुंडे यांनी दिले. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हवामान कृती आराखड्यांवर नियमित चर्चा व्हावी आणि मंत्रिमंडळ बैठकीत दरमहा हवामान बदल विषयाचा आढावा घेण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हवामान बदल हा भविष्यातील अत्यंत महत्त्वाचा विषय असून या संदर्भात राज्यातील सर्व विभागांमध्ये समन्वय राखणे आवश्यक असल्याचेही मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी नमूद केले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
