पावसाळ्यापूर्वी म्हाडा ॲक्शन मोडवर; मुंबईतील 86 अतिधोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करण्याचे आदेश

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील 86 अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारती तात्काळ रिकाम्या करून रहिवाशांना सुरक्षित पर्यायी निवास उपलब्ध करण्याचे निर्देश म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. सुमारे 2,736 रहिवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

Jun 19, 2026 - 22:38
 0  2
पावसाळ्यापूर्वी म्हाडा ॲक्शन मोडवर; मुंबईतील 86 अतिधोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करण्याचे आदेश
म्हाडा, अतिधोकादायक इमारती, मुंबई पावसाळा, संजीव जयस्वाल

मुंबई ब्यूरो अनिल सावरे 

मुंबई : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींमधील रहिवाशांच्या सुरक्षेसाठी म्हाडा प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या सर्वेक्षणात अतिधोकादायक घोषित करण्यात आलेल्या 86 उपकरप्राप्त इमारती तातडीने रिकाम्या करून आवश्यक दुरुस्ती व सुरक्षाविषयक उपाययोजना हाती घेण्याचे निर्देश म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत.

म्हाडा मुख्यालयात आयोजित पावसाळापूर्व तयारी आढावा बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धोकादायक इमारतींतील रहिवाशांचे तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यासह पर्यायी निवासाची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील 86 अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींमध्ये 2,256 निवासी आणि 480 अनिवासी असे एकूण 2,736 भाडेकरू व रहिवासी वास्तव्यास आहेत. पावसाळ्यात संभाव्य दुर्घटनांचा धोका लक्षात घेता या सर्वांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सध्या 29 रहिवाशांचे संक्रमण शिबिरात स्थलांतर करण्यात आले असून 36 रहिवाशांनी स्वतः पर्यायी निवासाची व्यवस्था केली आहे. उर्वरित रहिवाशांना निष्कासनाच्या नोटिसा देण्याची आणि गाळे रिकामे करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंडळाला सुमारे 2,120 रहिवाशांची संक्रमण शिबिरांमध्ये व्यवस्था करावी लागणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

म्हाडाकडे सध्या 750 संक्रमण गाळे उपलब्ध असून अतिरिक्त पर्यायी निवासासाठीही विविध पर्याय उपलब्ध असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. तसेच स्वतः पर्यायी निवासाची व्यवस्था करणाऱ्या पात्र रहिवाशांना दरमहा 20 हजार रुपये भाडे अनुदान देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला असल्याची माहिती जयस्वाल यांनी दिली.

पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी म्हाडाकडून विशेष नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असून अतिधोकादायक इमारतींची नियमित पाहणी, संरक्षक उपाययोजना, स्थानिक प्रशासनाशी समन्वय आणि आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था मजबूत केली जाणार आहे.

याच बैठकीत मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळामार्फत दरडप्रवण आणि डोंगर उतारांवरील वस्त्यांमध्ये उभारण्यात येणाऱ्या संरक्षण भिंतींच्या कामांचाही आढावा घेण्यात आला. मंडळाचे मुख्य अधिकारी सतीश भारतीय यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर जिल्ह्यात मंजूर झालेल्या 39 संरक्षण भिंतींपैकी 28 कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. तर मुंबई उपनगर जिल्ह्यात मंजूर 97 संरक्षण भिंतींपैकी 72 कामे पूर्ण झाली असून उर्वरित 25 कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.

नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संजीव जयस्वाल यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. मुंबईतील जुन्या व धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी म्हाडा कटिबद्ध असून पावसाळ्यात कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0