पिंपरी-चिंचवडकरांच्या हितासाठी महापौर रवि लांडगे आक्रमक; NHAI समोर शहरातील प्रलंबित प्रश्नांचा पाढा
पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रीय महामार्गांशी संबंधित प्रलंबित प्रश्न, वाहतूक कोंडी, पावसाळी समस्या आणि विकासकामांचा आढावा घेण्यासाठी महापौर रवि लांडगे यांनी NHAI अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. भोसरी उड्डाणपूल न पाडणे आणि अतिरिक्त भूसंपादन टाळण्याची ठाम भूमिका त्यांनी मांडली.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
भोसरी उड्डाणपूल पाडू नका, गावठाणात अतिरिक्त भूसंपादन नको; महामार्गावरील सर्व विकासकामे नागरिकहित जपूनच करा – महापौर रवि लांडगे
पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रीय महामार्गांशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न, वाढती वाहतूक कोंडी, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या आणि महत्त्वाच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी महापौर रवि लांडगे यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) चे प्रकल्प संचालक संजय कदम यांच्यासमवेत सविस्तर बैठक घेतली. यावेळी शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या विविध मुद्द्यांवर त्यांनी आक्रमक भूमिका घेत तातडीने कार्यवाहीची मागणी केली.
बैठकीत पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी, नाशिक फाटा ते खेड उन्नत मार्ग (Elevated Corridor) प्रकल्पाची सद्यस्थिती, मुंबई-बंगळुरू महामार्गालगत सेवा रस्त्यांचे रुंदीकरण, रस्त्यांची दुरुस्ती, अपघातप्रवण ठिकाणांवरील उपाययोजना, जलनिस्सारण व्यवस्था, अंडरपासमध्ये साचणारे पाणी आणि अतिक्रमणामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
याशिवाय मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग परिसरातील प्रस्तावित उड्डाणपूल, अंडरपास दुरुस्ती, सेवा रस्ते बांधणी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी हाती घेतलेल्या विविध विकासकामांची माहिती NHAI अधिकाऱ्यांनी दिली. वाकड, पुनावळे, ताथवडे, रावेत, किवळे आणि इतर भागांतील वाहतूक व पाणी साचण्याच्या समस्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून संबंधित कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.
भोसरी उड्डाणपूल आणि भूसंपादनावर ठाम भूमिका
बैठकीत भोसरी परिसराशी संबंधित दोन महत्त्वाचे मुद्दे महापौर रवि लांडगे यांनी ठामपणे मांडले. भोसरी येथील विद्यमान उड्डाणपूल कोणत्याही परिस्थितीत पाडू नये तसेच गावठाण परिसरात अतिरिक्त भूसंपादन करू नये, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली.
विकासकामांच्या नावाखाली स्थानिक नागरिक, व्यापारी आणि रहिवाशांवर अन्याय होऊ नये, यासाठी विकास आणि नागरिकहित यामध्ये समतोल राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भोसरी गावठाणातील नागरिकांच्या भावना आणि स्थानिक वाहतूक व्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचाही त्यांनी बैठकीत सविस्तर उल्लेख केला.
NHAI कडून सकारात्मक प्रतिसाद
महापौरांनी मांडलेल्या सूचनांची दखल घेत NHAI चे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सर्व विषयांवर सकारात्मक भूमिका घेत आवश्यक कामांना प्राधान्य दिले जाईल आणि संबंधित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
नागरिकांचे हित सर्वोच्च
यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले, "पिंपरी-चिंचवडकरांच्या हिताशी संबंधित कोणत्याही विषयात तडजोड केली जाणार नाही. राष्ट्रीय महामार्गांशी संबंधित प्रश्नांमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करणे, वाहतूक व्यवस्था सक्षम करणे आणि विकासकामे वेळेत पूर्ण करणे हे आमचे प्राधान्य आहे. भोसरी उड्डाणपूल आणि गावठाण भूसंपादनाच्या विषयावर नागरिकांच्या भावना सर्वोच्च मानूनच पुढील भूमिका घेतली जाईल."
महापौरांनी पुढे सांगितले की, शहराच्या विकासासोबतच नागरिकांचे हक्क आणि हित जपणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. महामार्ग विकासकामे, वाहतूक व्यवस्थापन आणि मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी महानगरपालिका आणि NHAI यांच्यात सातत्याने समन्वय ठेवला जाणार असून प्रलंबित कामांना गती देण्यासाठी नियमित आढावा बैठका घेतल्या जाणार आहेत.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0