स्थानिक नागरिकांच्या सूचनांनुसार उद्यानांचा विकास करा; महापौर रितू तावडे यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबईतील एन विभागातील उद्याने आणि मैदानांच्या विकासासाठी स्थानिक नागरिकांच्या सूचना व संकल्पना विचारात घेऊन आराखडे तयार करावेत, असे निर्देश मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिले. उद्यानांमध्ये मूलभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि लोकसहभाग वाढवण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

May 20, 2026 - 22:05
 0  2
स्थानिक नागरिकांच्या सूचनांनुसार उद्यानांचा विकास करा; महापौर रितू तावडे यांचे प्रशासनाला निर्देश
रितू तावडे, मुंबई महापौर, एन विभाग उद्याने, घाटकोपर उद्याने

मुंबई प्रतिनिधी उदय कासारे 

मुंबई : मुंबईतील उद्याने आणि मैदाने ही नागरिकांच्या विश्रांतीची, मनोरंजनाची आणि सार्वजनिक आरोग्याची महत्त्वाची केंद्रे असून त्यांच्या विकासामध्ये स्थानिक नागरिकांच्या सूचना आणि संकल्पना विचारात घेणे आवश्यक आहे, असे मत मुंबईच्या महापौर Ritu Tawde यांनी व्यक्त केले.

‘एन’ विभागातील विविध उद्याने आणि मैदानांच्या विकासासंदर्भात घाटकोपर येथील एन विभाग प्रशासकीय कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. उद्यानांचा विकास आणि पुनर्विकास करताना लोकसहभाग वाढविण्यासाठी सर्व नगरसेवकांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बैठकीत एन विभागातील राजावाडी उद्यान, लायन्स पार्क, केशरवाला उद्यान, क्लोव्हर मैदान, चित्तरंजन नगर मैदान, ९० फूट मार्गावरील आर. जी. उद्यान, प्रमोद महाजन उद्यान आणि जॉगर्स पार्क, डॉ. हेडगेवार उद्यान तसेच नाना-नानी पार्क यांच्या विकास आराखड्यांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी उपआयुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी, उपआयुक्त (परिमंडळ ६) संतोषकुमार धोंडे, एन विभागाचे सहायक आयुक्त मारुती पवार, उपप्रमुख वास्तुशास्त्रज्ञ (उद्याने कक्ष) अनघा कुडाळकर, कार्यकारी अभियंता (उद्याने कक्ष) बी. टी. सावंत तसेच स्थानिक नागरिक आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत स्थानिक नागरिकांनी विविध सूचना मांडल्या. उद्यानांना आकर्षक प्रवेशद्वार, पिण्याच्या पाण्याची सुविधा, प्रसाधनगृहे, पुरेशी प्रकाश व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सुविधा, चालणे आणि धावण्यासाठी ट्रॅक, मुलांसाठी खेळणी, उद्याने खुली ठेवण्याचा वाढीव कालावधी, सीसीटीव्ही व्यवस्था, सुरक्षारक्षक नियुक्ती, अतिक्रमण हटविणे आणि धूळ नियंत्रण उपाययोजना यांसारख्या बाबींवर भर देण्यात आला.

महापौर रितू तावडे यांनी ज्या उद्यानांना संपूर्ण नूतनीकरणाची आवश्यकता आहे, त्यांचे संकल्पना आधारित आराखडे तयार करून लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी सुविधा सुधारणा आणि दर्जावाढ शक्य आहे, त्या ठिकाणी कामे तातडीने हाती घेण्याचे आदेशही त्यांनी दिले.

उद्याने आणि मैदानांचा वापर स्थानिक नागरिकांसाठी असल्यामुळे त्यांच्या गरजा लक्षात घेऊन विकासकामे झाली पाहिजेत, असे सांगत लोकसहभागातून उद्याने आणि मैदानांचा विकास आणि संवर्धन होणे आवश्यक असल्याचे महापौरांनी नमूद केले.

उद्याने अपप्रवृत्तींपासून सुरक्षित ठेवणे, हिरवळ आणि वृक्षसंवर्धन करणे तसेच मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यावरही बैठकीत विशेष भर देण्यात आला.

एन विभागातील उद्याने आणि मैदानांबाबत चर्चा झालेल्या विकास प्रस्तावांवर जलद कार्यवाही करून आराखडे सादर करण्याच्या सूचनाही महापौर रितू तावडे यांनी प्रशासनाला दिल्या.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.