पावसाळ्यापूर्वी म्हाडाची धोकादायक इमारतींवर कारवाई; उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी अतिधोकादायक इमारतींची पाहणी केली

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर बेटावरील अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी पाहणी केली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करण्याचे निर्देश देण्यात आले असून समूह पुनर्विकासालाही गती देण्याचे आदेश देण्यात आले.

May 27, 2026 - 04:23
 0  6
पावसाळ्यापूर्वी म्हाडाची धोकादायक इमारतींवर कारवाई; उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी अतिधोकादायक इमारतींची पाहणी केली
म्हाडा, संजीव जयस्वाल, अतिधोकादायक इमारती

मुंबई ब्यूरो अनिल सावरे 

मुंबई, दि. २६ मे : पावसाळ्यापूर्व तयारीचा भाग म्हणून मुंबई शहर बेटावरील अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मोडकळीस आलेल्या आणि धोकादायक स्थितीतील इमारतींबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील जुन्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण सुरू असून संरचनात्मक लेखापरीक्षणात धोकादायक ठरण्याची शक्यता असलेल्या इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

यावेळी संजीव जयस्वाल म्हणाले की, "पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक निर्णय तातडीने घेतले जात आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून धोकादायक इमारती रिकाम्या कराव्यात."

पाहणी दौऱ्यादरम्यान सर्वप्रथम दादर पश्चिम येथील एस. के. बोले रोडवरील इमारत क्रमांक ३९-३९ ए व ४१-४१ ए इलम महल, तसेच पोर्तुगीज चर्च रोडवरील गोरेगावकर वाडी या इमारतींची पाहणी करण्यात आली.

या इमारतींमधील रहिवासी धोकादायक स्थितीत राहत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना भाडेकरू आणि रहिवाशांना तात्काळ निष्कासित करण्याचे निर्देश देण्यात आले.

तसेच संबंधित जागामालक आणि परिसरातील उपकरप्राप्त इमारतींच्या मालकांसोबत बैठक घेऊन विकास नियंत्रण नियमावली ३३(७) किंवा ३३(९) अंतर्गत समूह पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आले.

यानंतर प्रभादेवी येथील जगन्नाथ भातणकर मार्गावरील दया वीरा बिल्डिंग आणि विरा बिल्डिंग या धोकादायक इमारतींचीही पाहणी करण्यात आली.

या इमारतींमधील रहिवाशांना तातडीने इमारती रिकाम्या करण्याचे आवाहन करत, प्रचलित नियमांनुसार भाडे देण्याचे आश्वासन देण्यात आले. इमारती रिकाम्या झाल्यानंतर त्या तातडीने पाडण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.

याशिवाय नागपाडा येथील मौलाना आझाद रोडवरील इमारत क्रमांक ५०-६४ तसेच गिरगाव येथील मामा परमानंद मार्गावरील इमारत क्रमांक ३१ ए या अतिधोकादायक इमारतींचीही पाहणी करण्यात आली.

या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करून इमारती रिकाम्या करण्याचे आदेश देण्यात आले.

दरम्यान, कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पातील काही इमारतींचीही पाहणी यावेळी करण्यात आली.

या पाहणी दौऱ्यात मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे, उपमुख्य अभियंते अनिल अंकलगी, किशोरकुमार काटवटे, डी. एन. सूर्यवंशी, कार्यकारी अभियंते रेखा बोऱ्हाडे, राहुल पाटील, अनिल राठोड, सुनील देशपांडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मुंबईत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी म्हाडाकडून अतिधोकादायक इमारतींबाबत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.