पावसाळ्यापूर्वी नदी-नाले स्वच्छतेची कामे वेळेत पूर्ण करा; पूरप्रवण भागांसाठी पूर्वनियोजनाचे उपमहापौर संजय घाडी यांचे निर्देश
मुंबईतील पावसाळी पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर उपमहापौर संजय घाडी यांनी नदी-नाले स्वच्छतेची कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. पूरप्रवण भागातील नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतराचे पूर्वनियोजन, पाणी तुंबण्यावर कायमस्वरूपी उपाययोजना आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यावर त्यांनी भर दिला.
मुंबई, दि. ७ : येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नदी आणि नाले स्वच्छतेची कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी दिले आहेत. पाणी साचणाऱ्या ठिकाणांची अचूक ओळख करून तेथे कायमस्वरूपी उपाययोजना राबविणे, पूरप्रवण भागातील नागरिकांच्या स्थलांतराचे पूर्वनियोजन करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या.
उपमहापौर संजय घाडी यांनी एल विभागातील सुरू असलेल्या नाले आणि नदी स्वच्छता कामांची पाहणी केली. यामध्ये कुर्ला (पश्चिम) येथील साकीनाका मेट्रो स्थानकाजवळील नाला, सफेद पूल नाला आणि क्रांती नगर परिसरातील मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांचा समावेश होता.
यावेळी महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा मीनल तुर्डे, एल प्रभाग समिती अध्यक्ष विजयेंद्र शिंदे, सहाय्यक आयुक्त धनाजी हेर्लेकर तसेच पर्जन्य जलवाहिन्या आणि पूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमहापौर संजय घाडी यांनी सांगितले की, मुंबईत पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा आणि पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर नाले स्वच्छतेची कामे सुरू आहेत.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ मे २०२६ पर्यंत मोठ्या नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे ५१.४० टक्के, लहान नाल्यांमधील कामे ६२.८० टक्के तर मिठी नदीतील गाळ उपशाची कामे ३५.६० टक्के पूर्ण झाली आहेत. ३१ मे २०२६ पर्यंत नाले स्वच्छतेचे संपूर्ण उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अधिक मनुष्यबळ आणि संसाधनांचा वापर करून गाळ काढण्याची कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा किंवा अवजड वस्तू टाकू नयेत, असे आवाहन करत प्रशासन आणि नागरिकांनी संयुक्तपणे स्वच्छता राखण्यावर भर दिला.
नदी-नाल्यांमध्ये कचरा टाकण्यास प्रतिबंध करण्यासाठी जनजागृतीसोबतच आवश्यक असल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही उपमहापौरांनी दिले. भविष्यात पूरस्थिती निर्माण झाल्यास त्याचा सर्वाधिक फटका नदी-नाल्यांच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांनाच बसतो, याची जाणीव नागरिकांना करून देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
मिठी नदी परिसरातील गाळ काढण्याचे काम महानगरपालिका करत असून पुराचा धोका असलेल्या भागांतील नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून आपत्कालीन यंत्रणा सक्षम ठेवावी, असेही उपमहापौर संजय घाडी यांनी स्पष्ट केले.
What's Your Reaction?
Like
4
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

