मुंबई अग्निशमन दलाच्या ‘फ्लड रेस्क्यू ट्रेनिंग’वरून वाद; कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मुंबईतील तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर गिरगाव चौपाटी येथे सुरू असलेल्या ‘फ्लड रेस्क्यू ट्रेनिंग’ला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी बीएमसी एससी, एसटी, व्हीजेएनटी, एसबीसी, ओबीसी एम्प्लॉईज असोसिएशनने पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे. उष्माघात आणि वाढत्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

May 14, 2026 - 20:30
 0  3
मुंबई अग्निशमन दलाच्या ‘फ्लड रेस्क्यू ट्रेनिंग’वरून वाद; कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मुंबई अग्निशमन दल, फ्लड रेस्क्यू ट्रेनिंग, गिरगाव चौपाटी, अश्विनी भिडे,

मुंबई प्रतिनिधी उदय कासारे 

मुंबईतील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशमन दल मार्फत गिरगाव चौपाटी येथे सुरू असलेल्या ‘फ्लड रेस्क्यू ट्रेनिंग’वरून वाद निर्माण झाला आहे. बीएमसी एससी, एसटी, व्हीजेएनटी, एसबीसी, ओबीसी एम्प्लॉईज असोसिएशनने या प्रशिक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे.

असोसिएशनच्या निवेदनानुसार, मे महिन्यातील तीव्र उष्णतेमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गिरगाव चौपाटीवर ‘फ्लड रेस्क्यू ट्रेनिंग’साठी व्यस्त ठेवण्यात येत आहे. राज्य शासनाने PRO/259/ADV/2026-27 अंतर्गत अग्निसुरक्षेबाबत जनजागृती केली असून, बृहन्मुंबई महानगरपालिकेनेही उष्माघातापासून बचावासाठी विविध माध्यमांतून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.

दरम्यान, प्रमुख अग्निशमन अधिकाऱ्यांनी स्वतः मुंबईत तापमानात मोठी वाढ होत असल्याचे मान्य केले असून, उन्हाळ्यात आगीच्या मोठ्या घटनांची शक्यता नाकारता येत नसल्याचेही नमूद केले आहे. तरीही सहकारी अधिकाऱ्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून हे प्रशिक्षण सुरू ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

असोसिएशनने मांडलेल्या भूमिकेनुसार, मुंबई अग्निशमन दलात अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या आधीच अपुरी आहे. अशा स्थितीत वाढत्या उष्णतेमुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता कर्मचारी सतत सज्ज ठेवणे आवश्यक आहे. मात्र, उन्हाच्या तीव्र झळांमध्ये सुरू असलेल्या प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांना उष्माघाताचा धोका निर्माण होऊ शकतो.

या प्रशिक्षणादरम्यान एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याचा परिणाम मुंबईच्या अग्निसुरक्षेवर होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे ‘फ्लड रेस्क्यू ट्रेनिंग’ तात्काळ स्थगित करून ते पावसाळा किंवा हिवाळ्यात आयोजित करण्यात यावे, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0