मुंबईत पावसाळ्यात २४ वेळा समुद्राला मोठी भरती; १४ ते १९ जूनदरम्यान सलग सहा दिवस हाय टाइडचा इशारा

मुंबईत यंदाच्या पावसाळ्यात समुद्राला २४ वेळा मोठी भरती येणार असून १४ ते १९ जूनदरम्यान सलग सहा दिवस ४.५ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत. नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहून महानगरपालिकेच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Jun 4, 2026 - 19:55
 0  15
मुंबईत पावसाळ्यात २४ वेळा समुद्राला मोठी भरती; १४ ते १९ जूनदरम्यान सलग सहा दिवस हाय टाइडचा इशारा
मुंबईत पावसाळ्यात समुद्राला २४ वेळा मोठी भरती येणार असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई, दि. ३ जून : यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत समुद्राला तब्बल २४ वेळा मोठी भरती येणार असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत समुद्रात ४.५ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार असून नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, १४ जून ते १९ जून २०२६ या कालावधीत सलग सहा दिवस मोठी भरती येणार आहे. या काळात समुद्रातील लाटांची उंची ४.६५ मीटर ते ४.८७ मीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यांवर जाणे टाळावे आणि प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक मोठी भरती १६ जुलै २०२६ रोजी येणार असून त्या दिवशी समुद्रातील लाटांची उंची ४.८९ मीटरपर्यंत पोहोचणार आहे. जुलै महिन्यात १३ ते १८ जुलैदरम्यान सलग सहा दिवस मोठी भरती नोंदविण्यात येणार आहे.

ऑगस्ट महिन्यात १२ ते १६ ऑगस्ट या कालावधीत पाच दिवस मोठी भरती राहणार असून लाटांची उंची ४.५० ते ४.८३ मीटर दरम्यान राहील. तर सप्टेंबर महिन्यात १० ते १३ सप्टेंबर तसेच २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान एकूण सात वेळा मोठी भरती येणार आहे.

महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना विशेषतः समुद्रकिनाऱ्यांवर फिरण्यासाठी जाणारे पर्यटक, तरुण आणि मच्छीमार बांधवांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मोठ्या भरतीच्या कालावधीत समुद्र खवळलेला असण्याची शक्यता असल्याने जीवितहानी टाळण्यासाठी सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मुंबईत मान्सून काळात मुसळधार पाऊस आणि मोठी भरती एकाच वेळी आल्यास सखल भागांमध्ये पाणी साचण्याचा धोका वाढतो. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, महापालिका आणि संबंधित विभाग सतर्क असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहिती आणि सूचना यांचाच आधार घ्यावा, असेही महापालिकेने नमूद केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 4
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1