मुंबईतील मजूर सहकारी संस्थांना महापालिकेच्या सेवेत घेऊ; महापौर रितू तावडे यांची ग्वाही

मुंबईतील मजूर सहकारी संस्थांना महापालिकेच्या कामांमध्ये समाविष्ट करण्यासाठी लवकरच आयुक्तांशी चर्चा करणार असल्याची ग्वाही महापौर रितू तावडे यांनी दिली. दादर येथे आयोजित प्रशिक्षण शिबिरात त्यांनी ही घोषणा केली.

 - 
Apr 24, 2026 - 22:25
 0  14
मुंबईतील मजूर सहकारी संस्थांना महापालिकेच्या सेवेत घेऊ; महापौर रितू तावडे यांची ग्वाही
रितू तावडे, मुंबई महापौर, मजूर सहकारी संस्था

मुंबई प्रतिनिधी उदय कासारे 

दि. २४ एप्रिल २०२६ मुंबईत कार्यरत असलेल्या सुमारे **७०० ते ८०० मजूर सहकारी संस्थांचा मुंबई महापालिकेच्या सेवेत समावेश करून घेण्यासाठी लवकरच मनपा आयुक्तांशी चर्चा करणार असल्याची ग्वाही महापौर रितू तावडे यांनी दिली. मजूर सहकारी संस्थांना महापालिकेच्या कामांमधून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

दादर येथील कोहिनूर मंगल कार्यालयात मुंबई कोकण विभागीय मजूर सहकारी संघाच्या वतीने आयोजित सभासद संस्थांच्या प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर अध्यक्षस्थानी होते.

यावेळी उपमहापौर संजय घाडी, शहाजी पाटील, नगरसेवक प्रकाश दरेकर, राज्य कंझ्युमर फेडरेशनचे अध्यक्ष विठ्ठलराव भोसले, माजी आमदार रमेश कदम, संघाचे अध्यक्ष सुनील बांबुळकर यांच्यासह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठी कामगारांना संधी देण्याची गरज

महापौर रितू तावडे म्हणाल्या की, मुंबईने सर्वांना सामावून घेतले आहे. मात्र, मराठी माणूस मुंबईत टिकला पाहिजे आणि त्याच्या हाताला काम मिळाले पाहिजे. मजूर सहकारी संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी बांधव कार्यरत असून त्यांना संधी देण्यासाठी ठोस निर्णय घेण्यात येतील.

ठाणे महापालिकेने मजूर सहकारी संस्थांसाठी काढलेल्या परिपत्रकाचा अभ्यास करून तत्सम निर्णय मुंबईतही लागू करण्यासाठी आयुक्त अश्विनी भिडे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सहकारातून मोठी ताकद निर्माण – संजय घाडी

उपमहापौर संजय घाडी म्हणाले की, सहकार चळवळीने अनेक कार्यकर्त्यांना घडवले आहे. शासनाच्या काही निर्णयांमुळे मजूर सहकारी संस्थांना अडचणी आल्या होत्या, मात्र आता पुन्हा चांगली कामे मिळू लागली आहेत. मुंबई महापालिकेतही संस्थांना कामे मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी त्यांनी केली.

मोठ्या ठेकेदारांच्या दबावातून बाहेर पडावे – दरेकर

आमदार प्रविण दरेकर म्हणाले की, मुंबई महापालिका अजूनही मोठ्या ठेकेदारांच्या दबावाखाली आहे. मजूर सहकारी संस्थांमध्ये काम करणारे लोक मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यांना महापालिकेची कामे मिळाली तर मुंबईच्या स्वच्छतेत आणि विकासात मोठा हातभार लागेल.

ते पुढे म्हणाले की, स्वतःचा उगम मजूर सहकारी चळवळीतून झाला असून या चळवळीला बळकटी देणे ही आपली जबाबदारी आहे. काळानुसार मजूर सहकारी संस्थांनीही बदल स्वीकारणे आवश्यक आहे.

‘सहकारी महाराष्ट्र’ मुखपत्राचे २७ एप्रिलला प्रकाशन

प्रविण दरेकर यांनी सांगितले की, सोमवार २७ एप्रिल २०२६ रोजी ‘सहकारी महाराष्ट्र’ या मुखपत्राचे प्रकाशन मुंबई बँकेच्या सभागृहात राज्याचे सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते होणार आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0