नाशिक कुंभमेळा २०२७: त्र्यंबकेश्वर विकास कामे वेळेत पूर्ण करण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७ पार्श्वभूमीवर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी विकास कामे वेळेत व दर्जेदार पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
श्रीमती माधुरी अनिल वैद्य - नाशिक ब्यूरो
नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर परिसरातील विकास कामांना वेग देण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले आहेत.
त्र्यंबकेश्वर येथे विविध विकास कामांची पाहणी करताना त्यांनी संबंधित विभागांना स्पष्ट सूचना दिल्या की, सर्व पायाभूत सुविधा निर्धारित वेळेत आणि उच्च दर्जाने पूर्ण कराव्यात. यावेळी कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्य सचिवांनी सांगितले की, कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. नाशिक–त्र्यंबकेश्वर सहा पदरी रस्त्याच्या कामांना गती देण्याबरोबरच गुणवत्तेवर विशेष भर देण्याचे निर्देश देण्यात आले.
तसेच कुशावर्त कुंड परिसरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पाण्याची नियमित शुद्धता राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले. या परिसरातील विकास करताना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यावरही त्यांनी भर दिला.
याशिवाय बिल्वतीर्थ येथील जलशुद्धीकरण प्रकल्प, घाट आणि प्रयाग तीर्थ येथील सुविधा, तसेच गोदावरी नदी प्रवाही ठेवण्यासाठी सुरू असलेल्या सिंचन प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. कुंभमेळा कालावधीत अखंडित जलपुरवठा सुनिश्चित करण्यावरही प्रशासनाने लक्ष केंद्रित करावे, असे त्यांनी नमूद केले.
What's Your Reaction?
Like
5
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0