फुगेवाडीतील विनापरवाना झोपडीवर महापालिकेची कारवाई; ८७५ चौरस फूट अनधिकृत बांधकाम निष्कासित

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागाने फुगेवाडीतील संजयनगर झोपडपट्टी परिसरात अनधिकृत झोपडीवर निष्कासन कारवाई केली. सुमारे ८७५ चौरस फूट क्षेत्रफळावरील विनापरवाना बांधकाम हटविण्यात आले असून अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाईचा इशारा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.

Jun 6, 2026 - 01:34
 0  4
फुगेवाडीतील विनापरवाना झोपडीवर महापालिकेची कारवाई; ८७५ चौरस फूट अनधिकृत बांधकाम निष्कासित
फुगेवाडीतील विनापरवाना झोपडीवर महापालिकेची कारवाई

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. ४ जून : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागाने ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या सहकार्याने संजयनगर, फुगेवाडी येथील झोपडपट्टी परिसरातील विनापरवाना उभारलेल्या झोपडीवर निष्कासन कारवाई केली. या संयुक्त मोहिमेत सुमारे ८७५ चौरस फूट क्षेत्रफळावरील अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. उप आयुक्त अण्णा बोदडे आणि कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कारवाईचे नियोजन करण्यात आले.

कारवाईदरम्यान महापालिकेचे अधिकारी, अभियंते, बीट निरीक्षक, अतिक्रमण पथक तसेच ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते. या मोहिमेसाठी २० एमएसएफ जवान, ४ ब्रेकर, २ गॅस कटर आणि सुमारे ४० मजुरांची मदत घेण्यात आली.

पोलीस बंदोबस्तात कारवाई

कारवाईदरम्यान विजयकुमार चौबे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पोलीस उपायुक्त संदिप आटोळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांच्यासह १० पोलीस अधिकारी आणि ५० पोलीस अंमलदारांच्या बंदोबस्तात ही कारवाई शांततेत पार पडली.

नियमभंग करणाऱ्यांवर कठोर भूमिका

यासंदर्भात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले की, महापालिकेच्या जागेवर किंवा झोपडपट्टी क्षेत्रात कोणतेही अनधिकृत बांधकाम करणे नियमबाह्य आहे. अशा प्रकारची बांधकामे सुरू केल्यास किंवा उभारल्यास त्यावर कायद्यानुसार निष्कासन कारवाई करण्यात येईल.

त्यांनी पुढे सांगितले की, शहरातील पुनर्वसन प्रक्रिया आणि नियोजित विकासाला बाधा आणणाऱ्या कोणत्याही अनधिकृत संरचनेबाबत महापालिका कठोर भूमिका घेणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतेही अनधिकृत बांधकाम करू नये आणि सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन करावे.

महापालिकेच्या या कारवाईमुळे शहरातील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहिमेला अधिक गती मिळणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0