पावसाळ्यापूर्वी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नगरसेविका राजोल पाटील यांची धावपळ
प्रभाग क्रमांक ११४ मध्ये पावसाळ्यापूर्वी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नगरसेविका राजोल पाटील यांनी विविध भागांचा पाहणी दौरा करून नालेसफाई, पाणी निचरा, संरक्षण भिंती आणि नागरी सुविधांचा आढावा घेतला.
मुंबई ब्यूरो अनिल सावरे
मुंबई, दि. २३ (प्रतिनिधी): पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या गैरसोयींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रभाग क्रमांक ११४ मधील शिवसेना (उबाठा) पक्षाच्या नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी आपल्या प्रभागातील विविध भागांचा सविस्तर पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभागात पाणी तुंबणे, नाल्यांची अपुरी साफसफाई, दरडी कोसळण्याची शक्यता, संरक्षण भिंतींची दुरवस्था, मच्छरांची वाढ तसेच दूषित पाण्यामुळे उद्भवणारे आजार यांसारख्या समस्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.
नगरसेविका राजोल पाटील यांनी अशोक केदारे चौक (गाढव नाका), गणेश नगर मार्गे नारदास नगर, शिवाजी नगर, टेंभीपाडा रोड, वीर संभाजी सोसायटी, सायकल ट्रॅक परिसर, पोदार चाळ, पांडव कुंड, साई धाम सोसायटी, श्री सरस्वती विद्या मंदिर परिसर, हिल व्ह्यू, माने चाळ, लक्ष्मी सदन चाळ तसेच साई हिल परिसराला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला.
या पाहणीदरम्यान रस्ते, गटारे, पावसाच्या पाण्याचा निचरा, संरक्षण भिंती आणि इतर नागरी सुविधांची तपासणी करण्यात आली. अनेक नागरिकांनी आपल्या भागातील समस्या थेट नगरसेविकांसमोर मांडल्या. काही भागांमध्ये नाल्यांची साफसफाई अपूर्ण असल्याची तक्रार नागरिकांनी केली, तर काही ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
स्थानिकांशी संवाद साधताना राजोल पाटील यांनी नागरिकांच्या प्रत्येक समस्येची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांशी समन्वय साधून तातडीने उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये तसेच जीवितहानीसारख्या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी प्रशासनाने वेळेत कामे पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः ज्या भागांमध्ये दरडी कोसळण्याचा किंवा संरक्षण भिंतींचा धोका आहे, त्या ठिकाणी अधिक सतर्कता बाळगण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
पावसाळ्यापूर्वी आवश्यक कामांचा आढावा घेत प्रशासनाला सतर्क करण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत नगरसेविका राजोल पाटील यांनी सुरू केलेल्या या पाहणी मोहिमेमुळे प्रभागातील अनेक समस्या मार्गी लागतील, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0