रक्षक चौक उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात; औंध ते किवळे प्रवास होणार सिग्नलमुक्त

पिंपळे निलख येथील रक्षक चौक उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून, या प्रकल्पामुळे औंध ते किवळे दरम्यानचा प्रवास सिग्नलमुक्त आणि वाहतूककोंडीमुक्त होणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी दिली.

May 7, 2026 - 22:24
 0  4
रक्षक चौक उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात; औंध ते किवळे प्रवास होणार सिग्नलमुक्त
रक्षक चौक उड्डाणपूल, अभिषेक बारणे, शंकर जगताप, पिंपरी चिंचवड,

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपळे निलख येथील रक्षक चौकात सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, या पुलामुळे औंध ते सांगवी फाटा आणि रावेतमार्गे किवळेपर्यंतचा प्रवास लवकरच सिग्नलमुक्त आणि वाहतूककोंडीमुक्त होणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी दिली.

चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच या प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. तसेच पिंपळे गुरव येथील जनसंपर्क कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांसोबत प्रकल्पाच्या प्रगतीबाबत सविस्तर बैठकही पार पडली.

या पाहणीवेळी नगरसेविका आरती चोंधे, नगरसेविका स्नेहा कलाटे, महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सामाजिक कार्यकर्ते संकेत चोंधे, प्रसाद कस्पटे, सनी बारणे आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

रक्षक चौक हा शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा बिंदू मानला जातो. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. पुलासोबत बीआरटी बस वाहतुकीचे नियोजन, प्रवाशांची सुरक्षितता आणि वाहतुकीचे सुलभीकरण यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

प्रशासनाला पुलाचे रेलिंग आणि संपूर्ण प्रकल्पाचे तातडीने ‘सेफ्टी ऑडिट’ करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या उड्डाणपुलामुळे नागरिकांचा वेळ आणि इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होणार असून सांगवी ते किवळे बीआरटी मार्गावरील वाहतूक अधिक वेगवान आणि सुरळीत होणार आहे.

अभिषेक बारणे यांनी सांगितले की, “आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. हा पूल लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी सेफ्टी ऑडिटबाबत कठोर सूचना देण्यात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवडच्या शाश्वत विकासासाठी आणि सुलभ वाहतुकीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0