सकारात्मक दृष्टीकोनातून टीकेचा स्वीकार करावा : यशदाच्या प्रशिक्षक रविबाला काकतकर
यशदा येथील प्रशिक्षक रविबाला काकतकर यांनी मंत्रालयातील “TECHवारी 2.0” कार्यक्रमात टीकेचा सकारात्मक दृष्टीकोनातून स्वीकार करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
सामान्य प्रशासन विभाग आयोजित “TECHवारी 2.0” अंतर्गत मंत्रालयात झालेल्या विशेष तांत्रिक सत्रात रविबाला काकतकर यांनी टीकेचा सकारात्मक दृष्टीकोनातून स्वीकार करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
“The Art of Handling Criticism” या विषयावरील सत्रात त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संवाद कौशल्य, भावनिक संतुलन आणि आत्मविश्वास याविषयी मार्गदर्शन केले. टीका हा जीवनाचा अविभाज्य भाग असून तिला नकारात्मक न पाहता “फीडबॅक” म्हणून स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
रविबाला काकतकर म्हणाल्या की, भावनिक प्रतिक्रिया अनेकदा परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनवते, तर संयमाने आणि विचारपूर्वक दिलेले उत्तर व्यक्तीची परिपक्वता आणि नेतृत्वगुण दर्शवते. त्यांनी न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग (NLP) तत्त्वांच्या माध्यमातून शब्दांची निवड, आवाजाचा स्वर आणि देहबोली यांचा संवादशैलीवर होणारा परिणामही स्पष्ट केला.
टीका वैयक्तिक पातळीवर न घेण्याचा सल्ला देताना त्यांनी गौतम बुद्धांच्या जीवनातील बोधकथेचा उल्लेख केला. “एखादी व्यक्ती टीका स्वीकारत नसेल, तर ती टीका ज्या व्यक्तीने केली आहे त्याच्याकडे परत जाते,” असे त्या म्हणाल्या.
या संवादात्मक सत्रात योग्य प्रश्न विचारणे, समोरच्याचे म्हणणे संयमाने ऐकून घेणे आणि सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवणे ही प्रभावी नेतृत्वाची महत्त्वाची वैशिष्ट्ये असल्याचे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.
उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हे सत्र प्रेरणादायी, उपयुक्त आणि व्यवहार्य असल्याची प्रतिक्रिया दिली. संवाद कौशल्य आणि मानसिक संतुलनावर आधारित हे सत्र “TECHवारी 2.0” मधील प्रमुख आकर्षण ठरले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0