मुंबईतील प्रत्येक क्षेपणभूमी परिसरात वृक्ष लागवड; ‘रिरुट’ उपक्रमांतर्गत कांजूरमार्ग येथे १६ हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कांजूरमार्ग क्षेपणभूमी येथे ‘रिरुट (ReRoot)’ नागरी वन पुनर्स्थापना उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत १६ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असून नागरिकांनी हरित मुंबईसाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.
प्रतिनिधी | मुंबई - देवानंद शिंदे
कांजूरमार्ग क्षेपणभूमीत १६ हजार वृक्षांची लागवड; मुंबईला अधिक हरित बनविण्यासाठी नागरिकांना महापौरांचे आवाहन
मुंबई, दि. ५ : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिका आणि अँटोनी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘रिरुट (ReRoot)’ नागरी वन पुनर्स्थापना उपक्रमाचा शुभारंभ कांजूरमार्ग क्षेपणभूमी येथील कचरा प्रक्रिया केंद्रात करण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते झाला.
या उपक्रमांतर्गत कांजूरमार्ग क्षेपणभूमी परिसरात सुमारे १६ हजार नवीन वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये सातपेक्षा अधिक स्थानिक आणि पर्यावरणपूरक वृक्षप्रजातींचा समावेश असून मुंबईच्या हरित क्षेत्रात मोठी भर पडणार आहे. शुभारंभाच्या दिवशी शालेय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागातून सुमारे ७५० वृक्षांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाला स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, प्रभाग समिती अध्यक्षा साक्षी दळवी, उपआयुक्त किरण दिघावकर यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
हरित मुंबईसाठी नागरिकांच्या सहभागाचे आवाहन
यावेळी बोलताना महापौर रितू तावडे यांनी सांगितले की, मुंबईतील वाढते नागरीकरण आणि लोकसंख्येची घनता लक्षात घेता हरित क्षेत्र वाढविण्यावर विशेष भर दिला जात आहे. विकासकामांमुळे काही ठिकाणी वृक्षतोड करावी लागली असली तरी त्याची भरपाई करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण आणि वननिर्मितीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
“एका झाडाच्या बदल्यात दहा झाडे लावण्याचा संकल्प महापालिकेने स्वीकारला आहे. कांजूरमार्गप्रमाणेच इतर क्षेपणभूमी परिसर आणि गृहसंस्थांमध्येही अशा प्रकारे वृक्ष लागवड करून हरित क्षेत्र विकसित करण्यात येईल. मात्र, प्रशासनासोबत नागरिकांनीही पुढाकार घेत प्रत्येकाने किमान एक झाड लावावे,” असे आवाहन त्यांनी केले.
‘रिरुट’ उपक्रमातून नागरी वननिर्मिती
घनकचरा व्यवस्थापनाच्या पायाभूत सुविधांचे हरित आणि शाश्वत परिसंस्थेमध्ये रूपांतर करण्याच्या उद्देशाने ‘रिरुट’ उपक्रम राबविण्यात येत आहे. कांजूरमार्ग परिसरात आधीच सुमारे १२,८०० वनस्पती अस्तित्वात असून नव्या लागवडीमुळे हा परिसर अधिक हिरवागार आणि जैवविविधतेने समृद्ध होणार आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागातून बहावा आणि इतर स्थानिक वृक्षप्रजातींची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या उपक्रमामुळे मुंबईतील नागरी वनक्षेत्र वाढण्यास मदत होणार असून शहर अधिक पर्यावरणस्नेही आणि शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1