पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करा; दुष्काळमुक्त आणि जलसमृद्ध महाराष्ट्र घडवा – मंत्री संजय राठोड
हवामान बदल आणि एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जलसुरक्षा मजबूत करण्यासाठी जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे. जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेद्वारे राज्यभर जलसंधारणाची व्यापक कामे सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुंबई | प्रतिनिधी नरेश शिंदे
हवामान बदल आणि एल निनोच्या संभाव्य परिणामांमुळे राज्यातील पर्जन्यमानावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना, पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करून दुष्काळमुक्त आणि जलसमृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
मंत्री राठोड म्हणाले की, जलसंधारण ही केवळ पाणी अडविण्याची प्रक्रिया नसून पर्यावरण संवर्धन, भूजल पुनर्भरण, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची सुरक्षा आणि भावी पिढ्यांसाठी शाश्वत जलव्यवस्था निर्माण करण्याचे प्रभावी माध्यम आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, शेती, उद्योग आणि ग्रामीण जीवन मोठ्या प्रमाणात पाण्यावर अवलंबून असल्याने जलसुरक्षा ही आज विकासाबरोबरच अस्तित्वाचीही गरज बनली आहे.
एल निनोमुळे पावसावर परिणाम होण्याची शक्यता
यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनच्या पावसावर परिणाम होऊ शकतो. हवामान विभागाने राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पावसाचे असमान वितरण, काही भागांमध्ये पाणीटंचाई आणि भूजल पातळी घटण्याची शक्यता लक्षात घेता, उपलब्ध जलस्रोतांचे नियोजन आणि संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
"आपण पाऊस वाढवू शकत नाही, पण पडणारा प्रत्येक थेंब अडवू शकतो, जमिनीत मुरवू शकतो आणि भूजल साठे वाढवू शकतो. हाच जलसंधारणाचा खरा मूलमंत्र आहे," असे राठोड यांनी नमूद केले.
जलसुरक्षा मजबूत करण्यासाठी विविध योजना
राज्यातील जलसुरक्षा मजबूत करण्यासाठी मृद व जलसंधारण विभागाने विविध उपक्रम राबविले आहेत. गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना, जलयुक्त शिवार अभियान २.० आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (पाणलोट विकास घटक २.०) यांच्या माध्यमातून राज्यभर मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत.
सन २०२५-२६ मध्ये गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत सुमारे तीन कोटी घनमीटर गाळ काढण्यात आला असून तो शेतकऱ्यांच्या शेतात पसरविण्यात आला आहे. यामुळे जलाशयांची साठवण क्षमता वाढण्याबरोबरच जमिनीची सुपीकताही सुधारत असल्याचे मंत्री राठोड यांनी सांगितले.
तसेच तलावातून काढलेला गाळ शेतात पसरविणाऱ्या शेतकऱ्यांना मार्च २०२६ मध्ये २३ कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
जलयुक्त शिवार अभियानाची व्यापक अंमलबजावणी
जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत राज्यात सुमारे १.४० लाख कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यापैकी मोठ्या प्रमाणावर कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे याच वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (पाणलोट विकास घटक २.०) अंतर्गत हजारो शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभ देण्यात आला असून जलसंधारण आणि शेती विकासाचा प्रभावी समन्वय साधला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकचळवळीची गरज
जलसंधारणाच्या माध्यमातून महाराष्ट्रात व्यापक लोकचळवळ उभी करण्याची गरज असल्याचे सांगत मंत्री राठोड यांनी शासन, प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी एकत्रितपणे जलसंवर्धनासाठी काम करण्याचे आवाहन केले. राज्यातील जलसंधारणाच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
"पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करूया, दुष्काळाला हरवूया आणि जलसमृद्ध महाराष्ट्र घडवूया," असा संदेश मंत्री संजय राठोड यांनी राज्यातील नागरिकांना दिला.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1
