५ वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार झावबा वाडीतील वीज भरणा केंद्र; गिरगावकरांची गैरसोय दूर होणार

गिरगाव-ठाकूरद्वार परिसरातील झावबा वाडी येथील बंद पडलेले वीज भरणा केंद्र तब्बल पाच वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार आहे. नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागणीला प्रतिसाद देत बेस्ट प्रशासनाने केंद्राचे नूतनीकरण केले असून, १९ जून रोजी शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त या केंद्राचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.

Jun 18, 2026 - 17:07
Jun 18, 2026 - 17:07
 0  37
५ वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार झावबा वाडीतील वीज भरणा केंद्र; गिरगावकरांची गैरसोय दूर होणार
झावबा वाडी वीज भरणा केंद्र, गिरगाव वीज बिल केंद्र

मुंबई | प्रतिनिधी : मिलिंद कारेकर

गिरगाव-ठाकूरद्वार परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. झावबा वाडी येथील गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेले वीज भरणा केंद्र आता पुन्हा एकदा सुरू होणार असून, त्यामुळे नागरिकांची होत असलेली गैरसोय लवकरच दूर होणार आहे.

गिरगावातील जगन्नाथ शंकरशेठ मार्गावरील झावबा वाडी येथे असलेले वीज भरणा केंद्र मागील पाच वर्षांपासून बंद होते. यामुळे परिसरातील नागरिकांना वीज देयक भरण्यासाठी जी.टी. रुग्णालयासमोरील फाटकवाडी येथील बेस्ट कार्यालयात जावे लागत होते. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या अतिरिक्त प्रवासाचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.

सध्या अनेक नागरिक ऑनलाइन पद्धतीने वीज बिल भरत असले तरी वयोवृद्ध नागरिकांमध्ये ऑनलाइन व्यवहारांचा वापर तुलनेने कमी आहे. त्यामुळे ते प्रत्यक्ष भरणा केंद्र किंवा बेस्ट कार्यालयात जाऊन वीज देयके भरण्यास प्राधान्य देतात. परिणामी स्थानिक भरणा केंद्र बंद असल्याने त्यांची मोठी गैरसोय होत होती.

या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता. विधानसभा प्रमुख यशवंत कोळेकर, विधानसभा प्रमुख समीक्षा पोफळे आणि विधानसभा समन्वयक सुरज कांबळे यांनी नागरिकांच्या अडचणींची माहिती बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांना दिली. तसेच वीज भरणा केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी करणारे निवेदनही सादर केले.

या मागणीची दखल घेत बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी बेस्ट प्रशासनाला आवश्यक सूचना देऊन झावबा वाडी येथील वीज भरणा केंद्र पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार केंद्राची डागडुजी व आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त, १९ जून रोजी या वीज भरणा केंद्राचे लोकार्पण बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. केंद्र पुन्हा सुरू झाल्यानंतर गिरगाव आणि ठाकूरद्वार परिसरातील नागरिकांना वीज देयक भरण्यासाठी दूरवर जाण्याची गरज राहणार नसल्याने स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

नागरिकांमध्ये समाधान

झावबा वाडीतील वीज भरणा केंद्र पुन्हा सुरू होणार असल्याने विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि नियमितपणे प्रत्यक्ष केंद्रात जाऊन बिल भरणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नागरिकांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे स्थानिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0