वसुंधरा दिनानिमित्त ‘वसुंधरा रक्षक अभियान’चा शुभारंभ; पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांना पंकजा मुंडेंचे आवाहन
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ‘वसुंधरा रक्षक अभियान २०२६’ आणि ‘महा-आरपीईटी’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी नागरिकांनी पर्यावरण संरक्षणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
वसुंधरा दिनानिमित्त ‘वसुंधरा रक्षक अभियान’चा शुभारंभ; नागरिकांनी पर्यावरण रक्षणासाठी पुढे यावे – पंकजा मुंडे
मुंबई, दि. २२ – वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने ‘वसुंधरा रक्षक’ बनून पर्यावरण संवर्धनासाठी पुढे यावे, असे आवाहन राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘वसुंधरा रक्षक अभियान २०२६’, ‘महा-आरपीईटी अभियान’ आणि राज्य वातावरणीय कृती कक्षाच्या संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अभियानाच्या लोगोचेही अनावरण झाले.
मंत्री मुंडे म्हणाल्या, “वसुंधरा ही आपली आई आहे. तिचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. संतुलित विकासासोबत पर्यावरण रक्षणासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.”
या अभियानातून राज्यभर ‘वसुंधरा वॉरियर्स’ तयार करून पर्यावरणाबाबत जनजागृती केली जाणार आहे. नागरिकांनी झाडे लावणे, कचरा वर्गीकरण, प्लास्टिकचा वापर कमी करणे यांसारख्या कृतींमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
‘महा-आरपीईटी’ अभियानांतर्गत प्लास्टिक पुनर्वापरावर भर देण्यात येणार असून ‘Reduce, Reuse, Recycle, Rethink’ या तत्त्वांचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच उद्योगांमधील प्रदूषण नियंत्रणासाठी ‘इमिशन ट्रेडिंग स्कीम’ही राबविण्यात येणार आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी सांगितले की, या उपक्रमांमुळे विशेषतः तरुणांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता वाढेल. ‘वसुंधरा रक्षक’ व्हॉट्सॲप कम्युनिटीच्या माध्यमातून नागरिकांना या अभियानात सहभागी होता येणार आहे.
पर्यावरण संरक्षणासाठी प्रशासन, उद्योग आणि नागरिकांनी एकत्रितपणे जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0