विक्रोळीतील बंद आयसीयूवर नागरिकांचा संताप; महापौर रितू तावडे यांची रुग्णालयाला भेट, लवकरच कारवाईचे आश्वासन

विक्रोळीतील क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाचा अतिदक्षता विभाग (ICU) गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आंदोलनाची दखल घेत महापौर रितू तावडे यांनी रुग्णालयाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आणि आरोग्य सुविधा सुधारण्याचे आश्वासन दिले.

Jun 2, 2026 - 19:45
 0  8
विक्रोळीतील बंद आयसीयूवर नागरिकांचा संताप; महापौर रितू तावडे यांची रुग्णालयाला भेट, लवकरच कारवाईचे आश्वासन
महापौर रितू तावडे

मुंबई प्रतिनिधी : संतोष पांडे 

मुंबई : विक्रोळी येथील महापालिकेच्या क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयातील अतिदक्षता विभाग (ICU) गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य सुविधांअभावी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी स्थानिक रहिवाशांनी रुग्णालयातील बंद आयसीयूच्या निषेधार्थ मास्क घालून अनोखे आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी सोमवारी रुग्णालयाला भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.

महापौरांच्या दौऱ्यादरम्यान मोठ्या संख्येने नागरिक रुग्णालय परिसरात जमले होते. यावेळी नागरिकांनी बंद आयसीयू, अपुऱ्या आरोग्य सुविधा आणि रुग्णालयातील विविध समस्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला.

नागरिकांच्या तक्रारी आणि मागण्या ऐकल्यानंतर महापौर रितू तावडे यांनी रुग्णालयातील अतिदक्षता विभाग लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच रुग्णालयातील इतर आरोग्य सुविधांमध्येही सुधारणा करून नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विक्रोळी परिसरातील हजारो नागरिकांसाठी हे रुग्णालय महत्त्वाचे आरोग्य केंद्र असल्याने आयसीयू सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत आहे. महापौरांच्या भेटीनंतर आता प्रशासनाकडून कोणती ठोस पावले उचलली जातात, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1