महानगरपालिकेच्या मनुष्यबळातूनच दुरुस्ती कामे करा; कंत्राटदारांवरील अवलंबित्व कमी करण्याचे आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी रस्ता दुरुस्ती, पदपथ, दगडी कडा आणि दुभाजक यांसारखी नियमित कामे महानगरपालिकेच्या अंतर्गत मनुष्यबळामार्फत करण्याचे निर्देश दिले. अंधेरी, विलेपार्ले परिसरातील चौक्यांची पाहणी करत पावसाळापूर्व तयारीचाही आढावा घेतला.

May 27, 2026 - 20:52
 0  2
महानगरपालिकेच्या मनुष्यबळातूनच दुरुस्ती कामे करा; कंत्राटदारांवरील अवलंबित्व कमी करण्याचे आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश
बृहन्मुंबई महानगरपालिका, अश्विनी भिडे, मुंबई

मुंबई | प्रतिनिधी

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते, पदपथ, दगडी कडा (कर्ब स्टोन) आणि रस्ता दुभाजक यांसारखी नियमित व लहान-मोठी देखभाल-दुरुस्तीची कामे महानगरपालिकेच्या अंतर्गत मनुष्यबळामार्फतच करण्यात यावीत. दैनंदिन देखभाल कामांसाठी कंत्राटदारांवरील अवलंबित्व कमी करून महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा अधिक परिणामकारक वापर करावा, असे स्पष्ट निर्देश महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले.

महानगरपालिका परिरक्षण चौक्यांमध्ये आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध असूनही प्रभावी पर्यवेक्षणाचा अभाव असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी २६ प्रशासकीय विभागांच्या सहायक आयुक्तांना संबंधित चौक्यांतील मनुष्यबळाचा सखोल आढावा घेण्याचे निर्देश दिले.

मुंबईतील रस्ते दुरुस्ती आणि देखभाल कामांमध्ये नागरिकांना प्रत्यक्ष बदल जाणवेल, अशा पद्धतीने सहाय्यक अभियंता, दुय्यम अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांनी उत्तरदायित्वाने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चौक्यांची पाहणी, कर्मचाऱ्यांशी संवाद

आयुक्त अश्विनी भिडे यांनी अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातील घनकचरा व्यवस्थापन चौकी, विलेपार्ले पश्चिम येथील टाटा कंपाऊंडमधील कीटकनाशक चौकी तसेच बजाज मार्ग येथील परिरक्षण चौकीला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधत कामकाजाचे स्वरूप, अडचणी आणि सुविधा यांची माहिती घेतली. चौक्या अधिक सुस्थितीत ठेवण्याबरोबरच मूलभूत सेवा सुधारण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

मलेरिया नियंत्रणासाठी विशेष लक्ष

कीटकनाशक विभागाच्या कामकाजाचा आढावा घेताना विविध नियंत्रण उपकरणांची पाहणी करण्यात आली. मूषक नियंत्रण, डास नियंत्रण आणि खाद्यकचरा व्यवस्थापनावर अधिक भर देण्याचे निर्देशही देण्यात आले.

विशेषतः ‘के पश्चिम’ विभागातील नेहरू नगर परिसरात मलेरिया रुग्णसंख्या वाढल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित भागात विशेष कीटकनाशक उपाययोजना राबविण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी जनजागृती मोहिमांवर भर देण्याचाही आदेश देण्यात आला.

पावसाळ्यापूर्व तयारीचा घेतला आढावा

पाहणी दौऱ्यानंतर आयुक्त अश्विनी भिडे यांनी इर्ला नाला, एसएनडीटी नाला आणि गझदरबांध उदंचन केंद्र येथे भेट देत पावसाळ्यापूर्व तयारीचा आढावा घेतला.

उदंचन केंद्रातील यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्यासह पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या भागांमध्ये उपसा यंत्रणा प्रभावी ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

विशेषतः जुहू येथील इर्ला पर्जन्यजल उदंचन केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू ठेवून मिलन भुयारी मार्ग, कूपर रुग्णालय परिसर, विलेपार्ले रेल्वे स्थानक आणि जुहू-विलेपार्ले विकास क्षेत्रातील नागरिकांना पावसाळ्यात दिलासा मिळेल यावर भर देण्यात आला.

तसेच समुद्रकिनाऱ्याकडे वाहून जाणारा घनकचरा आणि तरंगता कचरा रोखण्यासाठी यांत्रिक जाळी प्रणालीचा प्रभावी वापर करण्याचेही निर्देश देण्यात आले.

यावेळी उपायुक्त प्रशांत गायकवाड, उपायुक्त मनीष वळंजू, सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0