शेतकऱ्यांसाठी ‘क्रॉपसॅप 2.0’ आणि ‘महाट्रेस’ उपक्रम सुरू; कीड-रोग व्यवस्थापन ते जागतिक बाजारपेठेपर्यंत तंत्रज्ञानाची साथ

राज्यातील शेतकऱ्यांना पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाधारित मार्गदर्शन मिळावे यासाठी कृषी विभागाने ‘क्रॉपसॅप 2.0’ उपक्रम सुरू केला आहे. तसेच कृषी उत्पादनांची जागतिक बाजारपेठेत विश्वासार्हता वाढविण्यासाठी ‘महाट्रेस’ हा ट्रेसिबिलिटी प्रकल्पही सुरू करण्यात आला आहे.

May 22, 2026 - 05:27
 0  3
शेतकऱ्यांसाठी ‘क्रॉपसॅप 2.0’ आणि ‘महाट्रेस’ उपक्रम सुरू; कीड-रोग व्यवस्थापन ते जागतिक बाजारपेठेपर्यंत तंत्रज्ञानाची साथ
क्रॉपसॅप 2.0, महाट्रेस, महाराष्ट्र कृषी विभाग, महाविस्तार अॅप, AI कृषी

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना पिकांवरील कीड आणि रोग व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाधारित तसेच तात्काळ मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागामार्फत ‘क्रॉपसॅप 2.0’ हा अद्ययावत उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांचे संरक्षण करण्यासाठी मदत मिळणार आहे.

सोयाबीन, कापूस, भात, तूर, मका, ज्वारी, ऊस आणि हरभरा या राज्यातील प्रमुख पिकांचा या प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आला आहे. कीड व रोगांमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळणे आणि शेतकऱ्यांना वेळेवर अचूक माहिती उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

‘क्रॉपसॅप 2.0’ अंतर्गत “महाविस्तार” अॅपद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित फोटो ओळख (Photo Identification) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकरी किंवा कृषी अधिकारी पिकांवरील कीड अथवा रोगांचे फोटो अपलोड करून त्याबाबत माहिती आणि उपाययोजना मिळवू शकणार आहेत.

याशिवाय, ज्या भागांमध्ये कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असेल, त्या भागांबाबत कृषी अधिकाऱ्यांना तातडीचे अलर्ट मिळणार आहेत. तसेच शेतकऱ्यांसाठी त्वरित पिक संरक्षण सल्ले देखील अॅपवर उपलब्ध होणार आहेत.

‘अचूक निदान, अचूक सल्ला आणि चला परतवू कीड-रोगांचा हल्ला’ हे या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील कृषी उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत अधिक विश्वासार्हता मिळावी आणि अन्न सुरक्षा मानकांचे प्रभावी पालन सुनिश्चित व्हावे यासाठी राज्य शासनाने ‘महाट्रेस’ हा अत्याधुनिक ट्रेसिबिलिटी उपक्रम सुरू केला आहे.

जागतिक बाजारपेठेत कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी अन्न सुरक्षा निकषांचे पालन करणे अत्यावश्यक असते. नियमांचे पालन न झाल्यास निर्यात खेप नाकारली जाण्याची शक्यता निर्माण होते. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर तसेच राज्याच्या कृषी उत्पादनांच्या विश्वासार्हतेवर परिणाम होऊ शकतो.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित महा-कृषी धोरणांतर्गत सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘महाट्रेस’ उपक्रमामुळे शेतमालाच्या उत्पादनापासून ते निर्यातीपर्यंतचा संपूर्ण प्रवास पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने नोंदविला जाणार आहे.

या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेतील नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार असून, राज्यातील कृषी उत्पादनांची गुणवत्ता आणि विश्वासार्हता वाढण्यासही हातभार लागणार आहे.

या संदर्भात सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह आणि सर्व विभागीय आयुक्त यांनी सादरीकरण केले.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0