माणसाला माणूस म्हणून जगू देणे, हेच संत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ विचार" – ज्ञानेश्वर माऊली वाबळे महाराज
पिंपरीतील विठ्ठलनगर पुनर्वसन येथे संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित प्रबोधनात्मक कीर्तनात कीर्तनकार ज्ञानेश्वर माऊली वाबळे महाराज यांनी संत परंपरा, समता, बंधुता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर भाष्य करत समाज परिवर्तनासाठी संत विचार आणि शुद्ध आचरणाचे महत्त्व अधोरेखित केले.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
दि. 21 मे 2026
"माणसांपेक्षा दगडांना अधिक महत्त्व देणारा समाज वाढू लागल्याने खऱ्या वारकरी विचारांचा पराभव होत आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे समता, शांती, बंधुता आणि न्याय आहे. माणसाला माणूस म्हणून जगू देणे, हेच संतांचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ विचार होते," असे प्रतिपादन प्रबोधनकार तथा कीर्तनकार ज्ञानेश्वर माऊली वाबळे महाराज यांनी केले.
पिंपरी येथील विठ्ठलनगर पुनर्वसन परिसरात सम्यक स्वयंसेवा संस्थेच्या वतीने आयोजित तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित प्रबोधनात्मक कीर्तन कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाचे आयोजन सम्यक स्वयंसेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ बनसोडे, ललिता बनसोडे, सिद्धांत बनसोडे, ज्योती बनसोडे आणि कौसल्या पंडित यांनी केले होते.
यावेळी नगरसेवक राहुल भोसले, नगरसेविका वैशाली घोडेकर (लोंढे), ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे, बाळासाहेब ढसाळ, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, पत्रकार गोपाल मोटघरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
संत परंपरा आणि सामाजिक समतेचा संदेश
ज्ञानेश्वर माऊली वाबळे महाराज म्हणाले की, महाराष्ट्राला मोठी वैचारिक परंपरा लाभली आहे. महात्मा फुले हे संत तुकाराम महाराजांच्या विचारांच्या वाटेवरून गेले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक विचारांचा वारसा पुढे नेला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजघटकांना एकत्र करून स्वराज्याची उभारणी केली. संत परंपरेने समाजात समता आणि बंधुभाव रुजवण्याचे कार्य केले असल्याचे त्यांनी नमूद केले.
ज्ञानेश्वरीतील विचारांचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, "भजन" म्हणजे केवळ धार्मिक विधी नसून समाजसेवा आणि मानवतेची जपणूक हा त्याचा खरा अर्थ आहे.
शुद्ध आचरण आणि समाज परिवर्तन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील शिस्त, अभ्यास आणि शुद्ध आचरणाचा उल्लेख करत वाबळे महाराज म्हणाले की, समाज परिवर्तनासाठी विचारांसोबत आचरणही महत्त्वाचे आहे.
"ज्याचे आचरण शुद्ध नाही, त्याचे समाजकारण, राजकारण किंवा परमार्थही प्रभावी होऊ शकत नाही," असे त्यांनी सांगितले.
आज समाजात अंधश्रद्धा, दिखावा आणि भेदभाव वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत त्यांनी माणुसकी, सेवा आणि सामाजिक समतेच्या मूल्यांना बळकटी देण्याचे आवाहन केले.
समाजहितासाठी काम करण्याची गरज
कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सामाजिक प्रश्नांवर काम करताना समानता आणि समाजहित यांना प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला विविध महिला बचत गटांच्या प्रतिनिधींसह परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संयुक्त जयंती महोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य, समता आणि प्रबोधनाचा संदेश देण्यात आला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0