जिल्हा आरोग्य संपन्न करण्यासाठी आरोग्य निर्देशांकांवर भर द्या; डॉ. विजय राठोड यांचे निर्देश
कोल्हापूर आरोग्य अभियान, माझं गाव आरोग्य संपन्न गाव, डॉ विजय राठोड, कोल्हापूर जिल्हाधिकारी, आरोग्य निर्देशांक, ग्राम आरोग्य योजना, महाराष्ट्र आरोग्य मोहीम, माता बाल आरोग्य,
कोल्हापूर : राज्यातील नागरिकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ या महत्वाकांक्षी अभियानाचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात ही बैठक पार पडली.
बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिपिंळे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मोहम्मद देशमुख यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी अभियानातील विविध निर्देशकांची काटेकोर अंमलबजावणी करून प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
अभियानांतर्गत संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोगांच्या नियंत्रणावर विशेष भर दिला जाणार आहे. क्षयरोग आणि कुष्ठरोग निर्मूलनासाठी १०० टक्के संशयित रुग्णांचा शोध घेऊन त्यांना तातडीने उपचाराखाली आणले जाईल. तसेच ३० वर्षांवरील प्रत्येक नागरिकाची मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोग तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
जलजन्य आणि कीटकजन्य आजारांना आळा घालण्यासाठी गावागावात शुद्ध पाणीपुरवठा, डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे आणि स्वच्छता मोहिमा राबविण्यात येणार आहेत. ग्रामस्थांना वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेबाबत जागरूक केले जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन यांनी दिली.
माता आणि बाल आरोग्य हा अभियानाचा केंद्रबिंदू असून १०० टक्के संस्थात्मक प्रसूती, गरोदर महिलांची वेळेत नोंदणी आणि बालमृत्यू-मातामृत्यू दर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. वात्सल्य कार्यक्रमांतर्गत गर्भधारणापूर्व व प्रसूतीपश्चात काळजी घेतली जाणार आहे.
० ते ५ वयोगटातील बालकांचे १०० टक्के लसीकरण, किशोरवयीन मुलामुलींसाठी मार्गदर्शन, ज्येष्ठ नागरिकांची काळजी आणि मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन या बाबींवरही भर देण्यात येणार आहे.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून हे अभियान संपूर्ण राज्यात राबवले जात असून ते केवळ शासकीय मोहीम न राहता लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी व्यक्त केली.
अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना २५ लाख ते ५ कोटी रुपयांपर्यंत बक्षिसे देण्यात येणार असल्याने गावांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होणार आहे. ग्राम आरोग्य स्वच्छता व पोषण समिती तसेच महिला आरोग्य समित्यांच्या माध्यमातून तळागाळात आरोग्य जनजागृती केली जाणार आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0