कोल्हापूर जिल्हा खरीप हंगामासाठी सज्ज; शेतीतील नव्या सुधारणा आणि उत्पादनवाढ दाखवा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर जिल्हा खरीप हंगाम २०२६ साठी सज्ज असून ३ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. कृषी विभागाने शेतीतील नव्या सुधारणा, उत्पादनवाढ आणि शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्यावर भर द्यावा, असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
कोल्हापूर : जिल्ह्यात कृषी विभागाचे काम समाधानकारक असून कृषी यांत्रिकीकरणात कोल्हापूर जिल्हा अग्रेसर आहे. मात्र शेतीमध्ये नव्या सुधारणा आणि उत्पादनवाढ प्रत्यक्ष दिसून यायला हवी, अशी स्पष्ट सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कृषी विभागाला दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात आयोजित खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला आमदार शिवाजी पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री आबिटकर यांनी कृषी विस्तार कामांना गती देण्याचे निर्देश देत माती परीक्षण मोहीम प्रभावीपणे राबवावी, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नवतंत्रज्ञानाची माहिती द्यावी आणि उत्पादनवाढीसाठी प्रत्यक्ष काम करावे, असे सांगितले. “कृषी अधिकारी हे शेतकऱ्यांचे शिक्षक बनावेत,” असेही त्यांनी नमूद केले.
मागील काळात कामात त्रुटी आढळलेल्या कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. याशिवाय ‘एक दिवस बळीराजा’ अभियान मिशन मोडवर राबवून पुढील महिनाभर विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेशही देण्यात आले.
बैठकीत ‘मागेल त्याला काजू कलमे’, ‘हुमणी कीड नियंत्रण पत्रक’ आणि ‘संतुलित खत माहिती पत्रक’ यांचे विमोचन करण्यात आले.
३ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन
आगामी खरीप हंगामासाठी कोल्हापूर जिल्ह्यात ३ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले असून त्यामध्ये ऊस पिकाखाली सर्वाधिक १ लाख ९८ हजार ६०४ हेक्टर क्षेत्र आहे. याशिवाय भातासाठी ९० हजार ६४० हेक्टर आणि सोयाबीनसाठी ४१ हजार ४४५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे.
खत आणि बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत प्रशासनाने माहिती देताना सांगितले की, २० हजार ६६ क्विंटल बियाण्यांची मागणी असून आतापर्यंत ५ हजार १३६ क्विंटल पुरवठा झाला आहे. तसेच १ लाख ८८ हजार ५४८ मेट्रिक टन खतांच्या मागणीपैकी सध्या ५२ हजार ३४३ मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध आहे.
शेतकऱ्यांसाठी कोट्यवधींचे अनुदान
कृषी यांत्रिकीकरणासाठी ६ हजार ८६० शेतकऱ्यांना ३१ कोटी ५८ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत २८३ कोटी रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधीअंतर्गत २७० कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यात वितरित झाला आहे.
२०२६-२७ च्या खरीप हंगामासाठी २ लाख १८ हजार २३४ लाख रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात आंबा, काजू, नारळ आणि केळी लागवडीला चांगला प्रतिसाद मिळत असून १ हजार ३३६ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेत कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
बोगस खत विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश
पालकमंत्री आबिटकर यांनी बोगस खत आणि बियाणे विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या शेती नुकसानीवर तातडीने उपाययोजना कराव्यात आणि प्रलंबित पीक विमा प्रकरणे तत्काळ निकाली काढावीत, असे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले.
शेतकऱ्यांनी ‘हुमणी कीड नियंत्रण स्पर्धा २०२६-२७’ मध्ये सहभागी व्हावे तसेच ‘मागेल त्याला काजू कलमे’ योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0