मुंबईत समुद्रातील तरंगता कचरा हटवण्यासाठी मानवरहित इलेक्ट्रिक बोट कार्यरत; दररोज ९० किलो कचऱ्याचे संकलन
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून समुद्र स्वच्छतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून गेटवे ऑफ इंडिया आणि बधवार पार्क परिसरात मानवरहित इलेक्ट्रिक बोट कार्यान्वित करण्यात आली आहे. या माध्यमातून दररोज ८० ते ९० किलो तरंगता कचरा संकलित केला जात आहे.
मुंबई | दि. १८ मे २०२६
मुंबईतील समुद्र किनारे आणि लगतचा परिसर अधिक स्वच्छ ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत गेटवे ऑफ इंडिया आणि बधवार पार्क परिसरात समुद्रातील तरंगता कचरा हटवण्यासाठी मानवरहित विद्युत नाव (इलेक्ट्रिक बोट) कार्यान्वित करण्यात आली आहे. या बोटींच्या माध्यमातून दररोज सुमारे ८० ते ९० किलो तरंगता कचरा संकलित केला जात आहे.
महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली हा उपक्रम प्रभावीपणे सुरू आहे.
‘ए’ विभागांतर्गत उपायुक्त (परिमंडळ-१) चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांच्या नेतृत्वात गेटवे ऑफ इंडिया आणि बधवार पार्क परिसरात या दोन मानवरहित इलेक्ट्रिक बोटी कार्यरत करण्यात आल्या आहेत.
ही बोट पूर्णपणे विद्युत ऊर्जेवर चालणारी असून पर्यावरणपूरक तंत्रज्ञानावर आधारित आहे. बोटींमध्ये वाहन वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (VTMS) आणि जागतिक स्थाननिर्धारण प्रणाली (GPS) बसविण्यात आली आहे. त्यामुळे बोटींचे मार्गक्रमण, कार्यक्षेत्र आणि सुरक्षिततेवर प्रभावी नियंत्रण ठेवता येते.
समुद्रातील प्लास्टिक, कचरा आणि इतर तरंगत्या वस्तूंचे संकलन अधिक नियोजनबद्ध आणि कार्यक्षम पद्धतीने करण्यासाठी या बोटी उपयुक्त ठरत आहेत. मुंबईतील सागरी प्रदूषण कमी करण्यासाठी आणि समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिकेचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0