नाशिकमध्ये कुंभमेळा विकास कामांवरून नागरिकांचा संताप; ८ दिवसांत सुधारणा करण्याचे आयुक्तांचे आश्वासन
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकास कामांमध्ये त्रुटी आढळल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. आयुक्त मनीषा खत्री यांनी ८ दिवसांत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.
नाशिक ब्यूरो:
आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या विकास कामांमधील त्रुटींमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. समन्वयाचा अभाव, नियोजनातील चुका आणि सुरक्षेकडे दुर्लक्ष या कारणांमुळे अनेक ठिकाणी समस्या वाढत असल्याचे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार देवयानी सुहास फरांदे आणि सीमा हीरे यांनी आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेऊन नागरिकांच्या समस्या मांडल्या.
शहरातील विविध विकास कामांमध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळत असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. काम सुरू करताना आवश्यक माहिती फलक लावले जात नसल्याने नागरिकांना अडचणी येत आहेत. तसेच ठेकेदारांकडून मनमानी पद्धतीने रस्ते खोदकाम सुरू असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या.
काँक्रीट रस्त्यांच्या कामांदरम्यान महावितरण च्या वीज तारा भूमिगत करण्याचा समावेश नसल्यामुळे भविष्यात पुन्हा रस्ते खोदावे लागतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली. यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होण्याची शक्यता आहे.
तसेच गटार, पाणीपुरवठा, MNGL आणि इतर विभागांमध्ये समन्वय नसल्याने एकाच रस्त्याचे वारंवार खोदकाम होत असल्याचे स्पष्ट झाले. काही ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याने अपघात होऊन दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना देखील घडली आहे.
अचानक रस्ते खोदल्यामुळे शहरात वाहतूक कोंडी वाढत असून वाहनांचे नुकसान आणि नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणावर होत आहे. अनेक ठिकाणी खोदकाम करून काम अपूर्ण अवस्थेत सोडले जात असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. त्यामुळे कामे २४x७ पद्धतीने पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
पर्यायी रस्त्यांची व्यवस्था न करता रस्ते बंद केल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खड्डे भरताना योग्य तांत्रिक पद्धतींचा अवलंब न केल्याने पावसाळ्यात रस्ते पुन्हा खराब होण्याची शक्यता आहे.
या सर्व समस्यांमुळे नागरिकांचा रोष लोकप्रतिनिधींवर व्यक्त होत असून, प्रशासनाकडून योग्य ती दखल घेतली जात नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, आयुक्त मनीषा खत्री यांनी या सर्व तक्रारींची गंभीर दखल घेत ८ दिवसांच्या आत आवश्यक सुधारणा करून सविस्तर सादरीकरण करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. तसेच संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून कामे अधिक प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

