सोमनाथ मंदिर भारताच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीक – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

सोमनाथ मंदिर हे भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि सनातन परंपरेच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईतील ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व – अतूट आस्थेचे १००० वर्ष’ कार्यक्रमात केले.

May 11, 2026 - 20:17
 0  4
सोमनाथ मंदिर भारताच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीक – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
सोमनाथ मंदिर, जिष्णु देव वर्मा, सोमनाथ स्वाभिमान पर्व, नरेंद्र मोदी, आशिष शेलार

मुंबई, दि. ११ : “सोमनाथ मंदिर हे केवळ एक मंदिर नसून भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि सनातन परंपरेच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीक आहे. हजारो वर्षांच्या आक्रमणांनंतरही सोमनाथ मंदिर आजही दिमाखात उभे आहे, ही भारताच्या सनातन शक्तीची साक्ष आहे,” असे प्रतिपादन जिष्णु देव वर्मा यांनी केले.

गुजरातमधील सोमनाथ मंदिर यांच्या पुनर्बांधणीस ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व – अतूट आस्थेचे १००० वर्ष’ या विशेष भक्तिपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मुंबईतील श्री धाकलेश्वर महादेव मंदिर येथे करण्यात आले होते. हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित करण्यात आला होता.

यावेळी इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता तथा सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे आणि मंदिराचे व्यवस्थापकीय विश्वस्त अशोक भन्साळे उपस्थित होते.

“सोमनाथ म्हणजे सनातन शक्तीचे प्रतीक”

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आपल्या भाषणात सोमनाथ मंदिराच्या ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वावर प्रकाश टाकला. महमूद गझनीपासून औरंगजेबापर्यंत अनेक परकीय आक्रमकांनी मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, मात्र श्रद्धा आणि मंदिराचे अस्तित्व कधीही नष्ट होऊ शकले नाही, असे त्यांनी नमूद केले.

“भारत हा केवळ भौगोलिक देश नाही, तर तो एक चिरंतन संस्कृती आहे. विविध मंदिरे, साधू-संत आणि सनातन परंपरेमुळे भारताचा आत्मा आजही जिवंत आहे. ‘सनातन’ म्हणजे ज्याचा अंत नाही आणि सोमनाथ मंदिर हे त्याचे जिवंत उदाहरण आहे,” असेही त्यांनी सांगितले.

सांस्कृतिक सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना शुभदा वराडकर यांच्या नृत्याविष्काराने झाली. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरेचा समृद्ध आविष्कार त्यांच्या सादरीकरणातून अनुभवायला मिळाला. उपस्थितांनी या नृत्याविष्काराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमानंतर मान्यवरांनी ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ प्रदर्शनालाही भेट दिली.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0