देशाच्या विकासात श्रमिकांचा सिंहाचा वाटा; विसरून चालणार नाही – कामगार नेते यशवंतभाऊ भोसले

पिंपरीतील संत तुकाराम नगर येथे राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त भव्य कामगार मेळावा पार पडला. कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी श्रमिकांच्या योगदानाचा गौरव करत त्यांच्या हक्कांसाठी सक्षम कायद्यांची गरज व्यक्त केली.

May 2, 2026 - 03:49
 0  5
देशाच्या विकासात श्रमिकांचा सिंहाचा वाटा; विसरून चालणार नाही – कामगार नेते यशवंतभाऊ भोसले
यशवंतभाऊ भोसले, कामगार दिन, महाराष्ट्र दिन, पिंपरी चिंचवड

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी-चिंचवडमधील संत तुकाराम नगर येथे १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात श्रमिकांच्या कष्ट, त्याग आणि संघर्षाचा गौरव करण्यात आला.

राष्ट्रीय श्रमिक आघाडी, महाराष्ट्र राज्य प्रणित भाजपा यांच्या वतीने तसेच संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादितचे अध्यक्ष कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. परिसर देशभक्ती आणि श्रमिकांविषयी आदराच्या भावनेने भारावून गेला होता.

यावेळी बोलताना कामगार नेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, श्रमिकांच्या श्रमांमुळेच भारत देशाचा विकास शक्य झाला असून त्यांच्या योगदानाचा विसर पडता कामा नये. “महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा सर्वात मोठे बलिदान श्रमिकांचेच दिसून येईल,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, शहरांच्या उभारणीत, उद्योगांच्या प्रगतीत आणि विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर श्रमिकांचा घाम आणि त्याग दडलेला आहे. मात्र अनेकदा त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते. श्रमिकांच्या हक्कासाठी आवाज उठवताना त्यांच्या संघर्षामागील मेहनत आणि जिद्द प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

भोसले यांनी संघटित कामगारांची संख्या कमी होत असून असंघटित कामगारांचे प्रमाण वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यामुळे भविष्यात आर्थिक दरी वाढण्याची तसेच रोजगार आणि छोट्या उद्योगांवर परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमुळे श्रमिकांच्या जीवनात सकारात्मक बदल झाले असल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधान आवास योजना आणि एसआरए प्रकल्पांचा उल्लेख केला. लाखो श्रमिकांना निवारा मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी आभार मानले.

तसेच श्रमिकांच्या न्याय हक्कांसाठी अधिक सक्षम आणि मूलभूत कायद्यांची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली श्रमिकांना न्याय मिळवण्यासाठी बळ मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या मेळाव्यात विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, युनियन प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शंकरराव शितोळे, जयदेव अक्कलकोट, दीपक पाटील, दिनेश पाटील, ओमकार जोकारे, अंकुश वाघमारे, लताताई पाटील, अमोल घोरपडे, दत्तात्रय गायकवाड, कैलास गव्हाणे, शिरीष सासवडे यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कामगार माता-भगिनींना अल्पोपहार देऊन सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0