इक्विनिक्स एमबी३ डेटा सेंटरचे उद्घाटन; प्रगत इंटरकनेक्टिव्हिटीमुळे शासनाला मोठा फायदा – मुख्यमंत्री फडणवीस
मुंबईत इक्विनिक्स एमबी३ डेटा सेंटरचे उद्घाटन झाले असून प्रगत इंटरकनेक्टिव्हिटी आणि बँडविड्थ वाढीमुळे शासकीय ऑनलाइन सेवा अधिक सक्षम होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विशेष वृत्त-
प्रगत इंटरकनेक्टिव्हिटी आणि बँडविड्थ वाढविण्याची क्षमता शासनासाठी उपयुक्त – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. ८ : शासकीय योजनांची ऑनलाईन अंमलबजावणी करताना बँडविड्थची कमतरता ही मोठी समस्या ठरत होती. विशेषतः शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यावर अचानक वाढणाऱ्या इंटरनेट ट्रॅफिकमुळे प्रणाली कोलमडण्याची शक्यता निर्माण होत असे. अशा परिस्थितीत प्रगत इंटरकनेक्टिव्हिटी आणि तत्काळ बँडविड्थ वाढविण्याची क्षमता शासनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘वर्षा’ निवासस्थानी इक्विनिक्स (Equinix) कंपनीच्या एमबी३ डेटा सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बळगन, मुख्य आर्थिक सल्लागार कौस्तुभ धवसे तसेच कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
इक्विनिक्स एमबी३ डेटा सेंटरची वैशिष्ट्ये
इक्विनिक्स ही जगातील आघाडीची डेटा सेंटर आणि इंटरकनेक्शन सेवा देणारी कंपनी असून ३६ देशांतील ७७ महानगरांमध्ये तिचे २८० डेटा सेंटर्सचे जाळे आहे. भारतातील पूर्णतः स्वतःच्या मालकीचे एमबी३ हे पहिले डेटा सेंटर असून सुमारे ३.७ एकर क्षेत्रावर ते उभारण्यात आले आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे ७५० दशलक्ष अमेरिकन डॉलर (सुमारे ६,००० कोटी रुपये) गुंतवणूक करण्यात आली आहे. पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर येथे ४,२०० पेक्षा अधिक कॅबिनेट्सची क्षमता उपलब्ध होणार आहे.
हे डेटा सेंटर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सेवांसाठी सक्षम आहे. हायब्रिड मल्टी-क्लाउड इंटरकनेक्शनमुळे जगभरातील इक्विनिक्सच्या डेटा सेंटर्सशी तसेच ११ हजारांहून अधिक ग्राहकांशी थेट जोडणी शक्य होणार आहे.
सौर ऊर्जेचा वापर
ऊर्जा शाश्वततेसाठी यवतमाळ येथे उभारलेल्या २६.६ मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पातून या डेटा सेंटरला मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा केला जात आहे. सध्या मुंबईतील इक्विनिक्स डेटा सेंटर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या उर्जेपैकी सुमारे ६० टक्के ऊर्जा सौर प्रकल्पातून मिळते.
या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील डिजिटल पायाभूत सुविधा अधिक मजबूत होणार असून शासकीय सेवा अधिक जलद, सुरक्षित आणि कार्यक्षम बनण्यास मदत होणार आहे.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0