कृषी सहायकांनी प्रत्यक्ष फिल्डवर जावे; शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी प्रबोधन करा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथे खरीप हंगाम 2026-27 नियोजन आढावा बैठकीत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कृषी सहायकांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांना पीक उत्पादन पद्धती, आधुनिक शेती आणि आर्थिक उत्पन्न वाढीसाठी मार्गदर्शन करावे, असे आवाहन केले.
कोल्हापूर, दि. 2 (जिमाका): कृषी सहायकांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांना पीक उत्पादन पद्धती, आधुनिक तंत्रज्ञान आणि आर्थिक उत्पन्न वाढीबाबत मार्गदर्शन करावे, असे आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
गारगोटी येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात राधानगरी, भुदरगड आणि आजरा तालुक्यातील खरीप हंगाम 2026-27 च्या नियोजनासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विविध कृषी योजनांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगारे, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे, किरण पाटील, तालुका कृषी अधिकारी महादेव खुडे (भुदरगड), एकनाथ गुरव (राधानगरी), दीपक मुळे (आजरा) यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री आबिटकर म्हणाले की, शेतकऱ्यांचे शाश्वत आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांना विविध पीक पद्धती, नवीन प्रयोग आणि पर्यायी शेतीकडे वळविण्यास कृषी विभागाने पुढाकार घ्यावा. कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.
तसेच, राधानगरी, भुदरगड आणि आजरा या तिन्ही तालुक्यांत आजपर्यंत किती माती नमुने घेण्यात आले याची विचारणाही त्यांनी केली. आगामी पंधरा दिवसांत कृषी आयुक्तांना गारगोटी येथे निमंत्रित करावे, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी संबंधित तिन्ही तालुक्यांच्या कृषी अधिकाऱ्यांनी सन 2026-27 खरीप नियोजनाचा आराखडा सादर केला. तसेच सन 2025-26 या वर्षात कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या विविध लाभ योजनांची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली.
बैठकीच्या प्रारंभी जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगारे यांनी बैठकीमागील उद्देश स्पष्ट केला. या बैठकीसाठी तिन्ही तालुक्यातील गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, मंडल अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0