राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांना गती देण्याचे निर्देश – मंत्री हसन मुश्रीफ

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अलिबाग, नंदुरबार, गोंदिया, सातारा आणि सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांचा आढावा घेत कामांना गती देण्याचे निर्देश दिले.

Apr 15, 2026 - 23:42
 0  6
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांना गती देण्याचे निर्देश – मंत्री हसन मुश्रीफ
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. 15 : महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सुविधांना बळकटी देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांचा सविस्तर आढावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला.

अलिबाग, नंदुरबार, गोंदिया, सातारा आणि सिंधुदुर्ग येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांच्या प्रगतीचा मंत्रालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेण्यात आला.

यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले की, दुर्गम व ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ही महाविद्यालये महत्त्वाची ठरणार असून सर्व कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करणे आवश्यक आहे.

बैठकीत प्रत्येक प्रकल्पाची प्रगती, निधी वितरण, मनुष्यबळ नियोजन तसेच आवश्यक पायाभूत सुविधांचा सखोल आढावा घेण्यात आला. काही ठिकाणी कामांना गती मिळाली असली तरी काही प्रकल्पांमध्ये विलंब होत असल्याचे निदर्शनास आले. विशेषतः सिंधुदुर्ग येथील प्रकल्पाच्या विलंबाबाबत संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे निर्देश मंत्री मुश्रीफ यांनी दिले.

तसेच रुग्णालयीन सुविधा, आधुनिक वैद्यकीय उपकरणे, विद्यार्थी वसतिगृहे आणि प्राध्यापकांसाठी आवश्यक सुविधा नियोजनबद्ध पद्धतीने उभारण्यावर भर देण्यात आला.

या प्रकल्पांच्या पूर्णत्वानंतर संबंधित भागातील नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध होतील आणि राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा दर्जा उंचावेल, असा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

बैठकीस वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त अनिल भंडारी, उपसचिव संदीप ढाकणे तसेच संबंधित वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0