मुंबई महापालिकेच्या आरोग्य सेवांच्या १०० दिवसांचा आढावा; ऑनलाइन बेड सुविधा, HPV लसीकरण आणि पारदर्शकतेवर भर

मुंबई महानगरपालिकेतील भाजपा-शिवसेना महायुतीच्या १०० दिवसांच्या कार्यकाळानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत आरोग्य सेवांमधील महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती देण्यात आली. ऑनलाइन बेड उपलब्धता प्रणाली, HPV लसीकरण मोहीम, GeM पोर्टलद्वारे वैद्यकीय साहित्य खरेदी आणि जन्म-मृत्यू दाखल्यांतील गैरप्रकारांवर नियंत्रण यासारख्या उपाययोजनांवर भर देण्यात आला.

May 22, 2026 - 01:44
 0  5
मुंबई महापालिकेच्या आरोग्य सेवांच्या १०० दिवसांचा आढावा; ऑनलाइन बेड सुविधा, HPV लसीकरण आणि पारदर्शकतेवर भर
मुंबई महानगरपालिका, हरिष भांदिर्गे, आरोग्य समिती, HPV लसीकरण,

मुंबई ब्यूरो अनिल सावरे 

मुंबई | दि. २१ मे २०२६

मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपा-शिवसेना महायुतीच्या प्रशासनाला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत मुंबईकरांसाठी सक्षम, पारदर्शक आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण उपाययोजनांची माहिती देण्यात आली.

मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाने केलेल्या कामांचा आढावा सादर करण्यात आला.

महानगरपालिका रुग्णालयांमध्ये ऑनलाइन बेड उपलब्धता प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे नागरिकांना कोणत्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहेत याची माहिती त्वरित मिळणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची होणारी धावपळ कमी करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

आरोग्य विभागातील खरेदी प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी वैद्यकीय साहित्य खरेदी Government e-Marketplace (GeM) पोर्टलच्या माध्यमातून करण्यावर भर देण्यात येणार आहे. यामुळे खर्च नियंत्रण, दर्जेदार साहित्य उपलब्धता आणि गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न होणार आहे.

महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या पार्श्वभूमीवर HPV लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे. १४ वर्षांवरील मुलींना या मोहिमेचा लाभ दिला जाणार असून प्रतिबंधात्मक आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकटी देण्याचा उद्देश आहे.

तसेच जन्म-मृत्यू दाखल्यांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी सुमारे ८७ हजार प्रकरणांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. बनावट दाखल्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महापालिकेच्या जागांवरील अनधिकृत बांधकामे, नियमबाह्य प्रकार आणि आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात आल्या असून नागरिकांना दर्जेदार आणि विश्वासार्ह आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समिती स्तरावर सातत्याने आढावा घेतला जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

या पत्रकार परिषदेस मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर रितूताई तावडे, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, विविध समित्यांचे अध्यक्ष, नगरसेवक आणि पत्रकार उपस्थित होते.

मुंबईकरांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत अधिक सक्षम आणि आधुनिक आरोग्य सेवा उभारण्यासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0