विनग्रुपची महाराष्ट्रात 8.5 अब्ज डॉलर्स गुंतवणूक; शाश्वत व आधुनिक शहरी विकासाला चालना

व्हिएतनामच्या विनग्रुपकडून महाराष्ट्रात 8.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होणार असून स्मार्ट टाउनशिप, इलेक्ट्रिक मोबिलिटी, सौर ऊर्जा आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Apr 8, 2026 - 18:55
Apr 9, 2026 - 00:46
 0  8
विनग्रुपची महाराष्ट्रात 8.5 अब्ज डॉलर्स गुंतवणूक; शाश्वत व आधुनिक शहरी विकासाला चालना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विशेष वृत्त-

विनग्रुपच्या प्रकल्पामुळे आधुनिक, एकात्मिक शहरी विकासाला चालना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ८ : व्हिएतनाममधील विन ग्रुप जॉईंट स्टॉक कंपनीकडून महाराष्ट्रात सुमारे 8.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची मोठी गुंतवणूक करण्यात येणार असून यामुळे राज्यातील शाश्वत नागरी विकास, हरित ऊर्जा, औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्यासोबत विनग्रुपचा सामंजस्य करार करण्यात आला. ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बळगन तसेच विनग्रुपचे (आशिया ऑपरेशन्स) मुख्य कार्यकारी अधिकारी फाम सान्ह चाऊ उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात वेगाने सुरू असलेल्या विकासाच्या पार्श्वभूमीवर विनग्रुपची गुंतवणूक ही महत्त्वाची पायरी ठरणार आहे. मुंबई व रायगड परिसर भविष्यात जागतिक स्तरावर स्पर्धा करणारा गतिमान शहरी भाग ठरेल. या प्रकल्पामुळे आधुनिक आणि सक्षम शहरी वातावरण निर्माण होईल.

5 हजार एकर क्षेत्रावर प्रकल्प; 24 हजार रोजगार अपेक्षित

या कराराअंतर्गत पुढील दोन वर्षांत सुमारे 5 हजार एकर क्षेत्रावर विविध प्रकल्प उभारले जाणार असून सुमारे 24 हजार 700 थेट रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील निवडक ठिकाणी हे प्रकल्प राबवले जाणार आहेत.

स्मार्ट टाउनशिप व इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्राधान्य

सुमारे 2,700 एकर क्षेत्रावर पर्यावरणपूरक आणि जागतिक दर्जाची स्मार्ट टाउनशिप उभारली जाणार आहे, ज्यामध्ये सुमारे दोन लाख लोकसंख्या राहू शकते. याशिवाय इलेक्ट्रिक टॅक्सी सेवा आणि मोबिलिटी-एज-अ-सर्व्हिस प्लॅटफॉर्म विकसित करण्याचा प्रस्ताव आहे.

शिक्षण, आरोग्य व चार्जिंग नेटवर्क विकास

विनस्कूलद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा, विनमेकद्वारे मल्टीस्पेशालिटी रुग्णालये आणि व्ही ग्रीनमार्फत राज्यभर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग नेटवर्क उभारले जाणार आहे. या प्रकल्पांसाठी सुमारे 170 एकर जमीन वापरण्यात येणार आहे.

500 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प

स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी 500 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यासाठी सुमारे 1,200 एकर जमीन वापरण्यात येईल.

पर्यटन क्षेत्रालाही मोठी चालना

पर्यटन वाढीसाठी 865 एकर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा थीम पार्क, प्राणीसंग्रहालय आणि सफारी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील पर्यटन आणि रोजगार निर्मितीला मोठा हातभार लागणार आहे.

राज्य शासन गुंतवणूकदारांना सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासन गुंतवणूक सुलभ करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0