चांदवड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरणासाठी खासदार निधीतून २५ लाख – रामदास आठवले

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी चांदवड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी खासदार निधीतून २५ लाख रुपयांची घोषणा केली. रिपाईच्या मेळाव्यात आनंदा ठोंबरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला.

May 15, 2026 - 21:54
 0  38
चांदवड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरणासाठी खासदार निधीतून २५ लाख – रामदास आठवले
रामदास आठवले, चांदवड, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, रिपाई मेळावा

नाशिक : चांदवड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण आणि सुधारणा करण्यासाठी खासदार निधीतून २५ लाख रुपये देण्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली. चांदवड येथे आयोजित रिपाईच्या नाशिक जिल्हा ग्रामीण कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या या कार्यक्रमात आनंदा वाळु ठोंबरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाईचे जिल्हाध्यक्ष संजय भालेराव होते. व्यासपीठावर काकासाहेब खंबाळकर, विनोद जाधव, अमोल पगारे, जाबीरदादा पठाण, रामबाबा पठाडे, गंगाभाऊ त्रिभुवन, प्रकाश जाधव, सिद्धार्थ केदारे, अॅड. विकास जाधव, उमेश जाधव, ताराचंद अहिरे, संजय बनकर, रविंद्र जाधव, वसंत जाधव आणि रविभाऊ अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.

रामदास आठवले म्हणाले की, रिपब्लिकन पक्ष हा सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. देशातील २८ राज्यांत रिपाईच्या शाखा कार्यरत असून या पक्षाच्या माध्यमातून सहा वेळा संसदेत जाण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, चांदवड येथे यापूर्वी दोन वेळा येण्याचा योग आला नव्हता. मात्र दलित पँथरपासून आजच्या रिपाईपर्यंत पक्षाची धुरा प्रकाश जाधव आणि अनिल केदारे यांसारख्या कार्यकर्त्यांनी जिवंत ठेवली, ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

देशातील सद्यस्थितीवर भाष्य करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले सोने खरेदी टाळण्याचे तसेच पेट्रोल-डिझेलची बचत करण्याचे आवाहन नागरिकांनी स्वीकारावे, असे सांगितले.

यावेळी चांदवडकरांच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. महिला भगिनींकडूनही त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला तालुक्यातील महिला-पुरुष कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मोहन यशवंते यांनी केले.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0