मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवी ऑनलाईन प्रणाली लवकरच सुरू; रुग्णांना मदत व उपचार मिळणार वेगाने
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची अद्ययावत ऑनलाईन प्रणाली लवकरच सुरू होणार असून रुग्णांना आर्थिक मदत आणि उपचारासाठी जलद प्रक्रिया उपलब्ध होणार आहे. अर्ज मंजुरी आता 8 तासांत पूर्ण होणार आहे.
मुंबई, दि. १२: राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत अधिक वेगाने मिळावी, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीची अद्ययावत ऑनलाईन प्रणाली लवकरच सुरू होणार आहे.
या नव्या प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन ८ तासांत पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे, आता रुग्णांना स्वतः अर्ज करण्याची गरज नसून संबंधित रुग्णालय थेट मदत कक्षाशी संलग्न होऊन अर्ज सादर करणार आहे. त्यामुळे उपचार प्रक्रियेला गती मिळणार आहे.
या प्रणालीचे उद्घाटन लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाकडून देण्यात आली आहे.
गेल्या वर्षभरात या कक्षामार्फत रुग्णस्नेही बदल करण्यात आले असून ही नवीन प्रणाली त्याचाच एक भाग आहे. रुग्णाने आवश्यक कागदपत्रे रुग्णालयात दिल्यानंतर रुग्णालय प्रशासन अर्ज मंजुरीसाठी पुढे पाठवणार आहे. सर्व कागदपत्रे योग्य असल्यास अर्ज ८ तासांत मंजूर होणार आहे.
गेल्या आर्थिक वर्षात (१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६) राज्यातील ४०,७७६ रुग्णांना एकूण ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले की, या नव्या प्रणालीमुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळतील आणि त्यांना मोठा दिलासा मिळेल.
अधिक माहितीसाठी १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?
Like
4
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0