योग हा जीवनशैलीजन्य आजारांवर रामबाण उपाय; नियमित योगाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जुहू बीच येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित केले. बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या आजारांपासून दूर राहण्यासाठी योग हा रामबाण उपाय असल्याचे सांगत त्यांनी नियमित योग करण्याचे आवाहन केले.

Jun 21, 2026 - 18:14
 0  5
योग हा जीवनशैलीजन्य आजारांवर रामबाण उपाय; नियमित योगाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
देवेंद्र फडणवीस, आंतरराष्ट्रीय योग दिन, योग दिन 2026

मुंबई प्रतिनिधी: नरेश शिंदे 

मुंबई, दि. 21 : बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या विविध आजारांचे प्रमाण वाढत असून या आजारांना दूर ठेवण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी आणि रामबाण उपाय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नियमित योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होत असल्याने प्रत्येकाने योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवावे, असे आवाहन त्यांनी केले.

जुहू बीचवरील फूड कोर्टजवळ आयोजित 12 व्या जागतिक योग दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खासदार रवींद्र वायकर, आमदार अमित साटम, शिवप्रकाश, केशव उपाध्ये, पवन त्रिपाठी, दीप्ती वायकर, उषा बेन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, सातत्याने योगाभ्यास करणारी व्यक्ती कोणत्याही मानसिक परिस्थितीत स्थिर राहून आव्हानांचा यशस्वीपणे सामना करू शकते. योगामुळे शरीर निरोगी राहते, मन प्रसन्न राहते आणि मानसिक संतुलन राखण्यास मदत होते. त्यामुळे योग विद्येचा प्रचार आणि प्रसार अधिक व्यापक प्रमाणात होणे आवश्यक आहे.

यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या इतिहासालाही उजाळा दिला. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव भारताने संयुक्त राष्ट्र संघात मांडला होता. संयुक्त राष्ट्र संघाच्या इतिहासात सर्वात कमी कालावधीत आणि कोणत्याही विरोधाशिवाय मंजूर झालेल्या प्रस्तावांपैकी हा एक प्रस्ताव असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताच्या पुढाकारामुळे आज जगभर योगाचा प्रसार झाला असून योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व जागतिक स्तरावर मान्य झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, व्यक्ती ही केवळ शरीर नसून मन आणि आत्म्याचाही समावेश असतो. योगामध्ये शरीर, मन आणि आत्मा या तिन्ही घटकांचा समतोल साधला जातो. योगाच्या माध्यमातून मनाचा निसर्गाशी असलेला संबंध अधिक दृढ होतो आणि व्यक्ती मानसिकदृष्ट्या सक्षम बनते.

कार्यक्रमादरम्यान शिवप्रकाश यांनीही आपले विचार व्यक्त केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांना योगाचा संदेश दिला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने योगशिक्षक, योगप्रेमी आणि नागरिक उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0