कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; नशामुक्ती अभियानाचीही सुरुवात
कोल्हापूर येथे जिल्हा प्रशासन आणि विविध विभागांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या उपस्थितीत योग प्रात्यक्षिके, गुणवंत खेळाडूंचा सत्कार, नशामुक्ती अभियानाची सुरुवात आणि योग मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
कोल्हापूर प्रतिनिधी : उमेश जाधव
कोल्हापूर, दि. 21 : जिल्हा प्रशासन, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभाग, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय, माय भारत आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी महासैनिक दरबार हॉल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 7 ते 9 या वेळेत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी आयुष मंत्रालयाच्या कॉमन योगा प्रोटोकॉलनुसार योग सत्राचे आयोजन करण्यात आले. जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. तसेच पहिल्या आंतरराष्ट्रीय योगासन क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता रोहित चव्हाण, 17 वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेले रोहिणी देवबा आणि हर्षवर्धन पाटील, तसेच इनर्व्हिल क्लब आयोजित योगास्पर्धेत प्रथम क्रमांक व ‘योगा क्विन’ पुरस्कार प्राप्त गंधाली खोपकर यांचा सत्कार करण्यात आला.
याशिवाय योग मार्गदर्शक रविभुषण कुमठेकर आणि संदीप पाटील यांचाही शाल, रोप आणि प्रमाणपत्र देऊन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना मान्यवरांनी योगाचे महत्त्व अधोरेखित केले. आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये योग ही काळाची गरज बनली असून योगामुळे शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक संतुलन, सकारात्मक विचारसरणी आणि निरोगी जीवनशैली विकसित होण्यास मदत होत असल्याचे सांगण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान जिल्हा प्रशासन, जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्ती अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थितांना प्रा. डॉ. श्वेता पुरुळेकर यांनी नशामुक्तीची शपथ दिली. तसेच मान्यवरांच्या हस्ते योग मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमास क्रीडा व युवक सेवा उपसंचालक सुहास पाटील, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, तालुका क्रीडा अधिकारी एल. जी. पवार, सुधाकर जमादार, मनीषा पाटील, क्रीडा अधिकारी अरुण पाटील, रोहिणी मोकाशी, स्नेहल जगताप-पाटील, राज्य क्रीडा मार्गदर्शक सीमा पाटील, माय भारतचे निलेश कांबळे, हॉकी प्रशिक्षक सागर जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक शिवाजी पाटील यांनी केले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0