मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षणासाठी रुजू न होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर सक्त कारवाई; प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे निर्देश

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी तातडीने रुजू न झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी दिले. उपआयुक्त, सहायक आयुक्त आणि मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

Jul 1, 2026 - 21:24
 0  8
मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षणासाठी रुजू न होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर सक्त कारवाई; प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे निर्देश
BMC, मतदार यादी, SIR, Special Intensive Revision, प्राजक्ता वर्मा

मुंबई | प्रतिनिधी नरेश शिंदे 

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन-SIR) कार्यक्रमासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी तातडीने रुजू न झाल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी दिले आहेत.

या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे परिमंडळीय उपआयुक्त, प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावरील सहायक आयुक्त आणि संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, अधिकारी सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार तसेच विविध मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी सांगितले की, सध्या महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पावसाळी कामकाजाची मोठी जबाबदारी आहे. मात्र, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) हेही तितकेच महत्त्वाचे काम असून दोन्ही जबाबदाऱ्यांमध्ये योग्य समन्वय साधून वेळेत आणि प्रभावीपणे काम पूर्ण करणे आवश्यक आहे.

मतदार यादी अद्ययावत आणि अचूक करण्यासाठी सुरू असलेल्या या विशेष मोहिमेत कोणताही विलंब किंवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0