ट्रिपल तलाक कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी आमदार देवयानी फरांदे आक्रमक; समान नागरी कायद्याबाबत सरकार सकारात्मक
विधानसभेत आमदार देवयानी फरांदे यांनी ट्रिपल तलाकच्या घटनांमुळे मुस्लिम महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनल्याचे सांगत लक्षवेधी मांडली. यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ट्रिपल तलाक कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल तसेच समान नागरी कायद्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले.
मुंबई / नाशिक ब्यूरो : ट्रिपल तलाकच्या घटनांमुळे मुस्लिम महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत असल्याचा मुद्दा उपस्थित करत आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. या चर्चेदरम्यान मुस्लिम महिलांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
फरांदे यांनी सांगितले की, गेल्या दीड महिन्यात नाशिकमधील तीन मुस्लिम महिलांनी त्यांच्याकडे मदतीसाठी संपर्क साधला. एका प्रकरणात महिलेवर जबरदस्तीने तलाक देण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप असून, नकार दिल्यानंतर ‘हलाला’ करण्याची तसेच वैयक्तिक व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या प्रकरणात पत्नीला चाकूचा धाक दाखविण्यात आल्याचा तर तिसऱ्या प्रकरणात महिलेला वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला.
मुस्लिम समाजातील बहुविवाहाच्या मुद्द्यावर बोलताना फरांदे यांनी पाकिस्तानमधील कायद्यांचा संदर्भ दिला. तेथे दुसरे लग्न करण्यासाठी पहिल्या पत्नीची लेखी संमती आणि संबंधित प्राधिकरणाची परवानगी आवश्यक असल्याने बहुविवाहाचे प्रमाण अत्यल्प असल्याचा दावा त्यांनी केला. भारतात अशा प्रकारच्या मर्यादा नसल्याने या विषयावर गंभीर विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी ट्रिपल तलाक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करणार का, तसेच उत्तराखंड आणि गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रात समान नागरी कायदा (युनिफॉर्म सिव्हिल कोड) लागू करण्याचा विचार आहे का, असे प्रश्न उपस्थित केले.
या चर्चेत आमदार सना मलिक यांनीही मुस्लिम महिलांच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर आपले मत व्यक्त करत चर्चेला समर्थन दिले.
समान नागरी कायद्याबाबत सरकार सकारात्मक
यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हा विषय अत्यंत संवेदनशील असल्याचे सांगत धार्मिक किंवा राजकीय दृष्टिकोनातून न पाहता महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.
नाशिकमधील संबंधित प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती देताना त्यांनी सांगितले की, राज्यात 2024 मध्ये ट्रिपल तलाकसंदर्भात 42 गुन्हे दाखल झाले असून 152 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर 2025 मध्ये 39 प्रकरणांमध्ये 137 जणांविरोधात कारवाई करण्यात आली असून 95 आरोपींना अटक झाली आहे.
या घटनांच्या पार्श्वभूमीवर 2019 मध्ये लागू झालेल्या ट्रिपल तलाक प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘ती तुमची मुलगी असती तर...’
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जयंत पाटील आणि आमदार सना मलिक यांनी या विषयावरील लक्षवेधी स्वीकारण्याबाबत हरकत नोंदवली. त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार देवयानी फरांदे यांनी, अशा प्रकारे त्रास सहन करणारी महिला तुमची मुलगी असती तर तुम्ही अशीच भूमिका घेतली असती का, असा सवाल उपस्थित केला.
या चर्चेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाशिक जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने हा विषय महत्त्वाचा असल्याचे नमूद करत लक्षवेधीवर चर्चा होण्यात कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट केले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0