मुंबई पोलिसांकडून ४४० तक्रारदारांना ३.२६ कोटींचा मुद्देमाल परत; पश्चिम परिमंडळ-३ ची उल्लेखनीय कामगिरी

मुंबई पोलीस पश्चिम परिमंडळ-३ अंतर्गत अंधेरी, एमआयडीसी, मेघवाडी, जोगेश्वरी, साकीनाका आणि पवई पोलीस ठाण्यांनी चोरी, गहाळ, फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांमधील ३ कोटी २६ लाख २३ हजार ९४७ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून ४४० तक्रारदारांना परत केला.

Jun 20, 2026 - 21:37
 0  10
मुंबई पोलिसांकडून ४४० तक्रारदारांना ३.२६ कोटींचा मुद्देमाल परत; पश्चिम परिमंडळ-३ ची उल्लेखनीय कामगिरी
पश्चिम परिमंडळ-३ अंतर्गत आयोजित मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमात ४४० तक्रारदारांना ३.२६ कोटी रुपयांचा मुद्देमाल सन्मानपूर्वक परत करण्यात आला.

मुंबई ब्यूरो अनिल सावरे 

मुंबई, दि. २० : पोलीस उप आयुक्त पश्चिम परिमंडळ-३, मुंबई यांच्या कार्यालयांतर्गत येणाऱ्या अंधेरी, एमआयडीसी, मेघवाडी, जोगेश्वरी, साकीनाका आणि पवई पोलीस ठाण्यांनी चोरी, गहाळ, फसवणूक तसेच सायबर गुन्ह्यांमधील एकूण ३ कोटी २६ लाख २३ हजार ९४७ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून ४४० तक्रारदारांना परत केला.

मरोळ-मरोशी रोड, अंधेरी (पूर्व) येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये आयोजित विशेष मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमात हा मुद्देमाल तक्रारदारांना सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आला.

पश्चिम परिमंडळ-३ अंतर्गत विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी आणि अंमलदारांनी चोरी, गहाळ मालमत्ता, फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांमधील मालमत्ता शोधून काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यातून मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले.

परत करण्यात आलेल्या मुद्देमालाचा तपशील

मौल्यवान सोने-चांदीचे दागिने (८५२ ग्रॅम) – १९ प्रकरणे – किंमत ₹६३.९६ लाख

रोख रक्कम – १० प्रकरणे – ₹१.३५ कोटी

दुचाकी वाहने – १७ – ₹१०.७५ लाख

तीनचाकी वाहने – ₹२१.९५ लाख

चारचाकी वाहने – ३ – ₹५.९५ लाख

मोबाईल फोन – ३७१ – ₹३७ लाख

सायबर फसवणूक प्रकरणांतील गोठविलेली रक्कम – ६ प्रकरणे – ₹४०.६४ लाख

इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू – ९ – ₹१०.८९ लाख

एकूण ४४० तक्रारदारांना ३,२६,२३,९४७ रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला.

तक्रारदारांकडून मुंबई पोलिसांचे कौतुक

कार्यक्रमात उपस्थित तक्रारदारांनी आपला हरवलेला अथवा चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अनेकांनी मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत, पोलीस दल नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असून आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडत असल्याचे मत व्यक्त केले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कामगिरी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) डॉ. मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उप आयुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन पवार आणि प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

अंधेरी, एमआयडीसी, मेघवाडी, जोगेश्वरी, साकीनाका आणि पवई पोलीस ठाण्यांतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक प्रशासन तसेच अधिकारी आणि अंमलदार यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ही उल्लेखनीय कामगिरी साध्य झाली.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0