ग्रामीण अर्थचक्राला चालना देणारी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ ही केवळ कर्जमाफीची योजना नसून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी गती देणारी महत्त्वपूर्ण योजना ठरत आहे.

Jun 27, 2026 - 00:54
 0  4
ग्रामीण अर्थचक्राला चालना देणारी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026,

मुंबई प्रतिनिधी: नरेश शिंदे 

विशेष लेख | दि. २६ जून : महाराष्ट्रातील शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. मात्र बदलते हवामान, नैसर्गिक आपत्ती, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारपेठेतील चढ-उतार यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडतात. अशा परिस्थितीत राज्य शासनाने जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ ही केवळ कर्जमुक्तीची योजना नसून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा व्यापक प्रयत्न आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या नावाने ही योजना जाहीर करण्यात आली आहे. आपल्या राज्यकारभारात शेती, सिंचन, जलव्यवस्थापन आणि रयतेच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या अहिल्यादेवींच्या लोकाभिमुख कार्याला या योजनेच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले आहे.

पश्चिम महाराष्ट्र हा ऊस, भात, ज्वारी, मका, भाजीपाला, फळबागा आणि दुग्धव्यवसायासाठी ओळखला जातो. कृष्णा, पंचगंगा, वारणा आणि दूधगंगा या नद्यांमुळे सिंचनाची सुविधा उपलब्ध असली तरी बदलते हवामान, उत्पादन खर्चातील वाढ आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे येथील शेतकरीही आर्थिक अडचणींना सामोरे जात आहेत. अशा वेळी वेळेवर मिळणारा आर्थिक आधार संपूर्ण ग्रामीण अर्थचक्राला गती देणारा ठरतो.

या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या थकीत अल्पमुदत पीक कर्जाची कर्जमुक्ती देण्यात येणार आहे. दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी ‘एकवेळ समझोता (OTS)’ योजनेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे थकबाकीदारांसह नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही न्याय मिळणार आहे.

कर्जमुक्तीनंतर शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज घेण्याचा मार्ग खुला होणार आहे. परिणामी बियाणे, खते, कीडनाशके आणि इतर शेतीसाठी आवश्यक भांडवल वेळेवर उपलब्ध होऊन उत्पादनक्षमतेत वाढ होण्यास मदत होईल. आधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, यांत्रिकीकरण आणि पीक विविधीकरणाचा स्वीकार करण्यासाठीही शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल.

योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि पारदर्शक ठेवण्यात आली आहे. त्यामुळे लाभ वितरण अधिक सुलभ, जलद आणि विश्वासार्ह होणार असून पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजना प्रभावीपणे पोहोचेल.

कर्जमुक्ती ही केवळ आर्थिक मदत नसून शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासाला मिळालेली नवी उभारी आहे. संकटातून सावरण्यासाठी आणि नव्या हंगामाची तयारी करण्यासाठी ही योजना शेतकऱ्यांना बळ देणारी ठरेल. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ ही शेतीला नवसंजीवनी देणारी, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी आणि शेतकऱ्यांच्या भविष्याला नवी दिशा देणारी महत्त्वपूर्ण योजना म्हणून पुढे येत आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0