पवईत आधुनिक अग्निसुरक्षा व जीवित संरक्षण प्रशिक्षणासाठी ‘एमसीएमसीआर–एफएसएआय’ कौशल्य विकास केंद्र सुरू

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एमसीएमसीआर आणि फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया (FSAI) यांच्या संयुक्त विद्यमाने पवई येथे आधुनिक अग्निसुरक्षा व जीवित संरक्षण प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि संशोधन सुविधा उपलब्ध असणार आहेत.

Jul 8, 2026 - 21:27
 0  4
पवईत आधुनिक अग्निसुरक्षा व जीवित संरक्षण प्रशिक्षणासाठी ‘एमसीएमसीआर–एफएसएआय’ कौशल्य विकास केंद्र सुरू
पवई, अग्निसुरक्षा, MCMCR, FSAI, मुंबई अग्निशमन दल,

प्रतिनिधी: संदीप गिरकर 

मुंबई | दि. ७ जुलै २०२६

आधुनिक अग्निसुरक्षा आणि जीवित संरक्षण प्रणालींचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महानगरपालिका क्षमता विकास व संशोधन केंद्र (MCMCR) आणि फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया (FSAI) यांच्या संयुक्त विद्यमाने पवई येथील एमसीएमसीआर परिसरात ‘एमसीएमसीआर–एफएसएआय कौशल्य विकास केंद्र’ (MFSDC) सुरू करण्यात आले आहे.

हे केंद्र महाराष्ट्रातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, अग्निशमन दल, वास्तुविशारद, अभियंते, विद्यार्थी, गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक आस्थापना तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून आधुनिक अग्निसुरक्षा प्रणालींचे प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिके येथे उपलब्ध होणार आहेत.

या केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एफएसएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपेन मेहता, मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुळगेकर, एमसीएमसीआरचे संचालक सुनील धामणे, तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अग्निसुरक्षा क्षेत्रातील व्यावसायिक उपस्थित होते.

अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा

कौशल्य विकास केंद्रात लाईव्ह एक्सपिरिएन्शियल लर्निंग लॅबोरेटरी उभारण्यात आली असून त्यामध्ये आधुनिक फायर डिटेक्शन सिस्टीम, फायर सप्रेशन सिस्टीम, पॅसिव्ह फायर प्रोटेक्शन, इव्हॅक्युएशन सिस्टीम, अग्निशमन उपकरणे, पंप, सेन्सर्स आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाची कार्यरत मॉडेल्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

या माध्यमातून सहभागी व्यक्तींना प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, हाताळणीवर आधारित प्रशिक्षण, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, संशोधन आणि नवोपक्रम यांची संधी मिळणार आहे.

सुरक्षित शहरांच्या निर्मितीस चालना

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी सांगितले की, हे केंद्र शहरी भागातील अग्निसुरक्षा सज्जता वाढविण्यासाठी आणि कौशल्याधारित प्रशिक्षणाला बळकटी देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.

या केंद्रातील सर्व अग्निसुरक्षा प्रणाली राष्ट्रीय इमारत बांधकाम मानके (NBCS) २०२६ तसेच महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीवित सुरक्षा उपाययोजना अधिनियम, २००६ यानुसार विकसित करण्यात आल्या आहेत.

प्रशिक्षणाबरोबरच संशोधन, नवोपक्रम आणि ज्ञानाची देवाणघेवाण यासाठीही हे केंद्र प्रभावी व्यासपीठ ठरणार असून, कुशल मनुष्यबळ तयार करणे, अग्निसुरक्षा व्यवस्थेला बळकटी देणे आणि सुरक्षित, सक्षम व अधिक लवचिक शहरांच्या निर्मितीस हातभार लावणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0