स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान म्हणजे श्रमप्रतिष्ठेचा सन्मान; ‘टीबीमुक्त मुंबई’ अभियानांतर्गत आयुष्मान कार्ड व PPE किटचे वितरण
टीबीमुक्त मुंबई’ अभियानांतर्गत कचरा वेचक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत आरोग्य कार्ड व पीपीई किटचे वितरण करण्यात आले. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सामाजिक संरक्षणासाठी सर्व घटकांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले.
प्रतिनिधी: देवानंद शिंदे
मुंबई | दि. ७ जुलै २०२६
मुंबई शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा आणि कचरा वेचकांचा सन्मान म्हणजे श्रमप्रतिष्ठेचा सन्मान आहे. त्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सामाजिक संरक्षणासाठी शासन, महानगरपालिका, उद्योग, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.
महाराष्ट्र लोकभवन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘टीबीमुक्त मुंबई’ अभियानांतर्गत चेंबूर येथील फाईन आर्ट्स कल्चरल सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते कचरा वेचकांना आयुष्मान भारत आरोग्य कार्ड तसेच वैयक्तिक सुरक्षा उपकरणे (PPE) किट वितरित करण्यात आली.
या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ, स्थानिक नगरसेविका आशा मराठे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपआयुक्त किरण दिघावकर, शरद उघडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा, इंटरनॅशनल अलायन्स ऑफ वेस्ट पिकर्सच्या उपाध्यक्षा सुशीला साबळे तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.
राज्यपाल जिष्णू देव वर्मा म्हणाले की, कचरा वेचकांना दररोज घातक कचरा, विषारी पदार्थ आणि संसर्गजन्य आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत आयुष्मान भारत आरोग्य कार्ड आणि PPE किटचे वितरण हा त्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे.
त्यांनी भारत सरकारच्या 'नमस्ते' (NAMASTE) योजनेचाही उल्लेख करत स्वच्छता व्यवस्थेचे यांत्रिकीकरण, सुरक्षित कार्यपरिसर आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षेला चालना मिळत असल्याचे सांगितले. घरगुती कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून प्रत्येक नागरिक स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम अधिक सुरक्षित करू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी अभिनेते जॅकी श्रॉफ म्हणाले की, "मुंबई शहर स्वच्छ ठेवणारे स्वच्छता कर्मचारी आणि कचरा वेचक हेच खरे हिरो आहेत. ते दररोज शहर स्वच्छ ठेवतात, त्यामुळेच आपण स्वच्छ वातावरणात श्वास घेऊ शकतो. त्यांनी शहरासोबतच स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी."
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी सांगितले की, मुंबईला टीबीमुक्त करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग सातत्याने प्रयत्नशील आहेत. दाट लोकवस्तीतील अतिजोखमीच्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर वेळेत उपचार करणे आणि नागरिकांनी प्राथमिक लक्षणे दिसताच वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
त्यांनी ‘टीबीमुक्त मुंबई’ हे अभियान केवळ शासकीय उपक्रम न राहता लोकचळवळ बनणे आवश्यक असल्याचे सांगत, नागरिकांच्या सक्रिय सहभागातूनच निरोगी आणि स्वच्छ मुंबईचे उद्दिष्ट साध्य होईल, असा विश्वास व्यक्त केला.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1