मुंबईत दमदार पावसाची हजेरी; ‘विहार’नंतर ‘तुळशी’ तलावही ओसंडून वाहू लागला
मुंबईतील मुसळधार पावसामुळे 'विहार' तलावानंतर आता 'तुळशी' तलावही ७ जुलै २०२६ रोजी रात्री ११:४३ वाजता ओसंडून वाहू लागला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी हा सर्वात लहान तलाव असून, सध्या सर्व तलावांतील एकूण जलसाठा ४१.४३ टक्क्यांवर पोहोचला आहे.
मुंबई प्रतिनिधी संदीप गिरकर
मुंबई | दि. ८ जुलै २०२६
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे 'विहार' तलावानंतर आता 'तुळशी' तलावही ओसंडून वाहू लागला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ७ जुलै २०२६ रोजी रात्री ११:४३ वाजता तुळशी तलाव पूर्ण भरून वाहू लागला. यापूर्वी त्याच दिवशी रात्री ९ वाजता विहार तलाव ओसंडून वाहण्यास सुरुवात झाली होती.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी तुळशी हा सर्वात लहान तलाव असून, तो बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील दोन तलावांपैकी एक आहे. तुळशी तलाव भरल्याने शहराच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असली, तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व सात तलावांतील एकूण जलसाठा अद्याप कमाल क्षमतेच्या ४१.४३ टक्के इतकाच आहे.
महानगरपालिकेच्या माहितीनुसार, ८०४.६ कोटी लिटर (८०४६ दशलक्ष लिटर) उपयुक्त जलसाठा क्षमता असलेल्या तुळशी तलावातून दररोज सरासरी १८ दशलक्ष लिटर (१.८ कोटी लिटर) पाणी मुंबईला पुरविले जाते. तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे तो यंदा लवकर भरून वाहू लागला आहे.
गेल्या वर्षी १६ ऑगस्ट २०२५ रोजी तुळशी तलाव भरून वाहू लागला होता, तर २०२४ मध्ये ४ ऑगस्ट रोजी तलाव ओसंडला होता. यंदा मात्र जुलैच्या पहिल्याच आठवड्यात तलाव भरल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
तुळशी तलावाची वैशिष्ट्ये
सन १८७९ मध्ये तुळशी तलावाचे बांधकाम पूर्ण झाले.
त्या काळात तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ४० लाख रुपये खर्च करण्यात आले होते.
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून हा तलाव सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर आहे.
तलावाचे पाणलोट क्षेत्र ६.७६ चौ. कि.मी., तर पूर्ण भरल्यानंतर पाण्याचे क्षेत्रफळ १.३५ चौ. कि.मी. आहे.
तुळशी तलाव ओसंडल्यानंतर त्यातील अतिरिक्त पाणी विहार तलावात जाऊन मिळते.
मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे शहराच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत असून, आगामी काळात आणखी पाऊस झाल्यास तलावांतील जलसाठ्यात अधिक वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1