मुंबईत दमदार पावसाचा प्रभाव; विहार तलाव रात्री ९ वाजता ओसंडून वाहू लागला
मुंबईतील मुसळधार पावसामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेचा विहार तलाव ७ जुलै २०२६ रोजी रात्री ९ वाजता ओसंडून वाहू लागला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक असलेल्या या तलावातून दररोज सुमारे ९ कोटी लिटर पाणीपुरवठा केला जातो.
मुंबई प्रतिनिधी संदीप गिरकर
मुंबई | दि. ७ जुलै २०२६
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेचा विहार तलाव मंगळवारी (७ जुलै) रात्री ९ वाजता पूर्ण भरून ओसंडून वाहू लागला आहे. यामुळे मुंबईच्या पाणीसाठ्यात आणखी भर पडली असून जलसाठ्याच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब मानली जात आहे.
महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २७,६९८ दशलक्ष लिटर (२,७६९.८० कोटी लिटर) उपयुक्त जलधारण क्षमता असलेला विहार तलाव मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक महत्त्वाचा तलाव आहे. या तलावातून दररोज सरासरी ९० दशलक्ष लिटर (९ कोटी लिटर) पाण्याचा पुरवठा केला जातो.
गेल्या काही दिवसांत तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे विहार तलाव यंदा ७ जुलै २०२६ रोजी रात्री ९ वाजता ओसंडून वाहू लागला. यापूर्वी १८ ऑगस्ट २०२५ रोजी हा तलाव भरला होता. तर २०२४ मध्ये २५ जुलै आणि २०२३ मध्ये २६ जुलै रोजी विहार तलाव ओसंडून वाहण्यास सुरुवात झाली होती.
विहार तलावाची वैशिष्ट्ये
विहार तलावाचे बांधकाम सन १८५९ मध्ये पूर्ण झाले.
त्या काळात तलाव उभारण्यासाठी सुमारे ६५.५ लाख रुपये खर्च करण्यात आले होते.
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून हा तलाव सुमारे २८.९६ किलोमीटर अंतरावर आहे.
तलावाचे पाणलोट क्षेत्र १८.९६ चौ. कि.मी., तर पूर्ण भरल्यानंतर पाण्याचे क्षेत्रफळ ७.२६ चौ. कि.मी. आहे.
तलाव पूर्ण भरल्यानंतर त्यातील अतिरिक्त पाणी मिठी नदीमध्ये वाहून जाते.
मुंबईतील मान्सून सक्रिय असल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाच्या तलावांमध्ये जलसाठा वाढत आहे. आगामी काही दिवसांतही पावसाचा जोर कायम राहिल्यास जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1