मुंबईत ३० जूनपासून बीएलओंच्या गृहभेटी; मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह सहकार्य करण्याचे आवाहन
बृहन्मुंबई क्षेत्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घराघरांत भेटी देणार आहेत. मतदारांनी आवश्यक माहिती व कागदपत्रे तयार ठेवून या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले आहे.
मुंबई प्रतिनिधी | नरेश शिंदे
मुंबई, दि. २९ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई (मुंबई शहर व उपनगरे) परिसरात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision-SIR) अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नागरिकांच्या घरी भेट देणार असून मतदारांनी आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी केले आहे.
या गृहभेटीदरम्यान बीएलओ मतदारांना गणना अर्ज देतील. संबंधित अर्जातील माहिती अचूक भरून त्यावर स्वाक्षरी करून त्याची एक प्रत बीएलओंकडे जमा करावी लागणार आहे.
प्रशासनाने नागरिकांना गृहभेटीपूर्वी निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा EC Net App वर जाऊन स्वतःचा किंवा आई-वडिलांचा जुना मतदार यादीतील तपशील (मतदारसंघ, भाग क्रमांक, अनुक्रमांक इ.) शोधून ठेवण्याचे आवाहन केले आहे.
ज्या मतदारांचे किंवा त्यांच्या आई-वडिलांचे नाव जुन्या मतदार यादीत उपलब्ध नसेल त्यांनी जन्मदाखला, पासपोर्ट, दहावीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, सरकारी किंवा सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी अथवा निवृत्तीवेतन ओळखपत्र, कुटुंब नोंदवही, शासनाने दिलेले जमीन किंवा घरवाटप प्रमाणपत्र, वनहक्क प्रमाणपत्र, राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा पुरावा, बँक, टपाल, जीवन विमा महामंडळ किंवा शासनाने १ जुलै १९८७ पूर्वी दिलेले ओळखपत्र अथवा आधार कार्ड यापैकी कोणतेही एक कागदपत्र तयार ठेवावे. तसेच अलीकडील पासपोर्ट आकाराचे छायाचित्रही जवळ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मतदारांना त्यांच्या जुन्या मतदार यादीतील तपशील शोधण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करता येणार आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी नजीकच्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा १८०० २२ १८५० या टोल-फ्री हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1