श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरातून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना; ५६ दिंड्यांसह १५ हजारांहून अधिक वारकऱ्यांचा सहभाग

आषाढी एकादशी निमित्त श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी भावपूर्ण वातावरणात पंढरपूरकडे रवाना झाली. ५६ दिंड्या आणि १५ हजारांहून अधिक वारकरी या सोहळ्यात सहभागी झाले असून, २८ दिवसांचा प्रवास करत पालखी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे पोहोचणार आहे.

Jun 30, 2026 - 00:01
 0  8
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरातून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना; ५६ दिंड्यांसह १५ हजारांहून अधिक वारकऱ्यांचा सहभाग
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी, त्र्यंबकेश्वर पालखी, आषाढी एकादशी, पंढरपूर वारी, वारकरी संप्रदाय,

त्र्यंबकेश्वर | नाशिक ब्युरो : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी सोमवारी भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. 'संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज की जय' च्या जयघोषात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा संपन्न झाला.

निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिरातून सजविलेल्या चांदीच्या रथामध्ये संतांच्या पादुका विराजमान करून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. या रथाचे सारथ्य राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. यावेळी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, निवृत्तीनाथ संस्थानचे पदाधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

यंदाच्या पालखी सोहळ्यात ५६ दिंड्या आणि १५ हजारांहून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत. त्र्यंबकेश्वरहून निघालेली पालखी विविध जिल्ह्यांतून २८ दिवसांचा प्रवास करत आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पोहोचणार आहे.

प्रस्थानानंतर पालखीला कुशावर्त तीर्थ येथे विधिवत स्नान घालण्यात आले. त्यानंतर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेतर्फे पालखी आणि वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रथेनुसार पालखीने श्री भगवान त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर नाशिकच्या दिशेने प्रस्थान केले.

गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेल्या नव्या परंपरेनुसार यंदाही पालखीचा पहिला मुक्काम नाशिक शहरात न होता बेगलवाडी फाटा येथील महानिर्वाणी आखाड्यात होणार आहे. त्यानंतर मंगळवारी सकाळी पालखी नाशिककडे रवाना होईल आणि रात्रीचा मुक्काम सातपूर गावात असेल.

बुधवारी सकाळी नाशिक पंचायत समिती येथे नाशिक महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखीचे स्वागत व सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर पालखी नाशिक शहर, नाशिक रोड मार्गे सिन्नर तालुक्यात प्रवेश करेल.

४ जुलै रोजी दातली येथे पालखीचे पहिले गोल रिंगण पार पडणार असून, त्यानंतर पालखीचा प्रवास अहिल्यानगर जिल्ह्याकडे सुरू होणार आहे. पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होत भक्ती, नामस्मरण आणि परंपरेचा उत्सव साजरा करणार आहेत.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0